IMD Alert ! जळगावला पुढचे काही तास महत्वाचे, नेमकं काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यावरील अवकाळीचे ढग कायम असून जळगाव जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना पुढच्या काही तासात जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यात जळगावसह धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड, परभणी, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांना पुढील ३ ते ४ तासात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

एकीकडे उन्हाचा चटका बसत असताना राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागील दोन तीन दिवसापासून जळगावसह राज्यातील इतर भागात अवकाळी पावसाचा जोर वाढलेला दिसतोय. शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी

२९ फेब्रुवारीला अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.