IMD Alert : राज्यात विजांच्या कडकडटांसह तुफान पावसाचा इशारा, जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव/मुंबई । गेल्या अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत असलेला मान्सून आता लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र त्यापूर्वी गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यातील अनेक भागाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढलं आहे. जळगावतही मुसळधार पाऊस झाला. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रावर बुधवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी व महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट
मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगावात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहे. लोकसभेच्या निकालाच्या दिवशी सायंकाळी जळगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसाने शहरातील अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, आज दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवेल. सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.