जळगाव/पुणे । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी मागल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जून निम्मा उलटला तरी अद्याप म्हणावा तास पाऊस झाला नाहीय. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान आता हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली. पुढील ३-४ दिवसांत राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, आज जळगावसह अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला.
यंदा गतवर्षीपेक्षा वेळेपूर्वी मान्सून महाराष्ट्रात एंट्री घेतली पण सुरुवातीचे काही दिवस राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र काही दिवसापासून पाऊस गायब झाला आहे. यातच हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसतील. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच येत्या ४८ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.