नागपूर : आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रच्या ठिकाणी असलेल्या रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
या बैठकीत आमदार आमशा पाडवी, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार , महिला बाल कल्याण आणि दृकश्राव्यद्वारेचा सचिव श्रीमती रुबल अग्रवाल , नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी , सावन कुमार यांसह आरोग्य विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते.
विधान भवन, नागपूर येथे आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुचना दिल्या की, नंदुरबार, पालघर, धुळे अशा आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी. येणाऱ्या अडचणी आणि लागणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर अहवाल सादर करावा.
आयुर्वेदिक डॉक्टरांची पद भरती करावी. कंत्राटी भारतीचा प्रस्तावही लवकर सादर करावा. त्यास आरोग्य खात्याने तातडीने मंजुरी द्यावी. आरोग्य सेविका भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेने लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची पूर्ण वेळ कर्मचारी भारती होण्यापूर्वी खाजगी तत्वावर भरती करून त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
यामध्ये ज्यांना अनुभव नसेल त्यांना जवळच्या रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला ज्या महिला दक्षता समिती आहेत त्या अद्ययावत करून त्याची दर महिन्याला आढावा बैठक घेतली जावी. बोट रुग्णवाहिका अद्ययावत आणि सुस्थितीत ठेवाव्यात त्याची वेळोवेळी पाहणी करावी. तसेच आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी प्रसूती पूर्व केंद्र स्थापन करावे. या कक्षात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्या गरोदर महिलांना प्रसूती पूर्वी किमान १० दिवस आधी या कक्षामध्ये दाखल करावे.
गरोदर मातांसह त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची व जेवणाची सोय असावी. प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्रसूती पूर्वकक्ष आहे त्याची माहिती पोहचवावी. प्रसूतीमध्ये माता मृत्यू होण्याची जास्त शक्यता असलेल्या गावांची यादी तयार करून त्या गावांवर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.