राहुरी । वांबोरी शिवारात एका अनैतिक संबंधाचा अत्यंत भीषण शेवट झाला आहे. 53 वर्षीय प्रियकराने आपल्या 28 वर्षीय प्रेयसीची क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मृत युवती सोनाली राजू जाधव ही पुणे जिल्ह्यातील पोखरी येथे वास्तव्यास होती. तिचा पती राजू जाधव गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात होता. या काळात तिचे सखाराम धोंडाजी वालकोळी (वय 53, रा. निरगुडसर, आंबेगाव, पुणे) याच्याशी प्रेमसंबंध जुळले. सोनाली आणि सखाराम काही काळ एकत्र राहिले. मात्र, काही दिवसांपूर्वी सोनालीचा पती तुरुंगातून सुटून घरी परतला आणि तिने आपल्या पतीकडे परतण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एक गर्भवती, दुसरीची प्रसूती
हा निर्णय सखारामला मान्य नव्हता. सोनालीने नातेसंबंध तोडल्याने तो चिडला होता. तो तिला वारंवार धमक्या देऊ लागला. “माझ्यासोबत राहा, नाहीतर तुला सोडणार नाही,” असे म्हणत तिला त्रास देऊ लागला.
दरम्यान, 19 फेब्रुवारी रोजी सोनाली आणि सखाराम यांची भेट राहुरी तालुक्यातील अहिल्यानगर बस स्थानकावर झाली. त्यानंतर सखारामने सोनालीला वांबोरी येथील महादेव मंदिराजवळ डोंगरावर नेले. तिथे दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात सखारामने सोनालीची क्रूर हत्या केली.
हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?
आरोपीने स्वतः दिली गुन्ह्याची कबुली
हा भीषण प्रकार घडवल्यानंतर सखाराम वालकोळी थेट वांबोरी पोलीस चौकीत हजर झाला आणि स्वतः गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर भादंवि कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.