पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समन्वयक बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघाची समन्वय बैठक होणार असल्याने बैठकीचे महत्त्व वाढले आहे.
संघातर्फे दरवर्षी परिवारातील संघटनांची समन्वय बैठक घेतली जाते. हरियाणामधील पानिपत जिल्ह्यात १२ ते १४ मार्च दरम्यान झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत समन्वय बैठकीची तारीख व स्थान निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पार पडणार आहे. मुख्य बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान होणार असली तरी त्यापूर्वी दोन दिवस व त्यानंतर दोन दिवसही विशेष बैठका होणार आहेत. या बैठकीची जय्यत तयारी सुरु आहे.
काय असते समन्वय बैठक
संघ परिवारातील मुख्य ३५ हून अधिक संस्थांच्या प्रतिनिधींची ही बैठक असते. या बैठकीत सरसंघचालक व सरकार्यवाहांच्या उपस्थितीत या संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री (सरचिटणीस) उपस्थित असतात. हे प्रतिनिधी आपल्या संघटनेचा कार्यअहवाल सादर करतात. त्यानंतर चर्चा होऊन पुढील कार्याची दिशा निश्चित केली जाते. पुण्यातील बैठकीत संघ परिवारातील सुमारे ३५ ते ४० संघटनांचे २५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील असा अंदाज आहे.