नागपूर : सोशल मीडियावरील इन्फ्लुर्स किंवा सोशल मीडियावरुन आपल्या मित्र-मैत्रिणींना दाखवण्यासाठी, चाहत्यांसाठी अनेकजण रिल्स बनवतत असतात. अनेकदा पर्यटनाला जाताना, पर्यटनस्थळाचेही रिल्स बनवले जातात. त्यामुळेच, आता समृद्धी महामार्गावर रिल्स बनवणाऱ्यांसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर रिल्स काढणाऱ्यांना ५०० रुपये दंड आणि १ महिना कारावासाची शिक्षा करण्यात येईल. महामार्ग वाहतूक पोलिसांनी याबाबत माहिती देत प्रवाशांना इशारा दिला आहे.
समृद्धी महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा १२० किमी प्रतितास एवढी आहे. या वेगाने वाहने येत-जात असतील तर वाहतुकीला कुठलाही अडथळ नाही पाहिजे. रिल्स बनवताना किंवा महामार्गावर इतर कुठल्याही शूट करताना अडथळा होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते. म्हणूनच, खरबरदारीचा उपाय म्हणत हा निर्णय घेण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर वाहन थांबवून रिल्स बनवणे किंवा व्हिडिओ शूट करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, कलम ३४१ नुसार १ महिना कारवास किंवा ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, २८३ या कलमान्वये सार्वजनिक रस्त्यावर धोका किंवा असुविधा निर्माण होईल, असा आरोप ठेवत संबंधित वाहनचालक वा प्रवाशांवर २०० रुपये दंडासह कारावासाची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.