तरुण भारत लाईव्ह न्युज चाळीसगाव : चाळीसगावातील सेवानिवृत्त महिलेच्या पर्समधील अडीच लाख रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या चोरट्या महिलांनी लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली होती. या प्रकरणी चोरी होताना सेवानिवृत्त महिलेला संशय आल्यानंतर तिने आरडा-ओरड केल्याने जमावाने तीन महिलांना पकडत ठेवत पोलिसांना पाचारण केल्यानंतर यंत्रणेने महिलांच्या चौकशीअंती चौथ्या महिलेला ताब्यात घेत चोरी केलेल्या बांगड्या हस्तगत केल्या. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चंदनपुरी, ता.मालेगाव येथील चौघा महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या सतर्कतेने आरोपी जाळ्यात
अफसाना जहिरुद्दीन पंजाबी (57, मदिना मस्जीजदजवळ, रजा नगर, हुडको कॉलनी, चाळीसगाव) यांनी 2 एप्रिल सायचंद मोतीलाल ज्वेलर्सकडे दोन लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 43 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या बनवण्यासाठी टाकल्या होत्या व मंगळवारी सकाळी दुकानदाराने बांगड्या तयार असल्याचे सांगून त्या नेण्याचे फोन करून कळवल्यानंतर महिलेने मुलगी हिनासह बांगड्या ताब्यात घेतल्या मात्र पाळत ठेवून असलेल्या भामट्या महिलांनी पंजाबी यांचा पाठलाग सुरू केला. जुन्या नगरपालिका गेटजवळ पंजाबी या आंबे खरेदी करीत असताना संशयित महिला आल्या व त्यांनी घेराव घालत पंजाबी यांना पुढे जावू न दिल्याने पंजाबी यांना संशय आला व त्यांनी पर्स तपासली असता त्यातून बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडा-ओरड केली. यावेळी जमावाने संशयित तीन महिलांना ताब्यात घेतले मात्र चौथी पसार झाली व त्याचवेळी शहर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर महिलांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले व चौथ्या महिलेला पीरमुसा कादरी दर्ग्याजवळून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पंजाबी यांच्या तक्रारीवरून राणी दीपक राक्षे, आशाबाई गणेश कांबळे, सुलोचना अर्जुन सकट व अनिता दिने फाजगे (सर्व रा.चंदनपुरी, ता.मालेगाव) यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली तसेच बांगड्या जप्त करण्यात आल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश बेलदार, नाईक राहुल सोनवणे, नाईक दीपक पाटील, नाईक भूषण पाटील, नाईक अमोल भोसले, कॉन्स्टेबल निलेश पाटील, प्रवीण जाधव, समाधान पाटील आदींच्या पथकाने केली. दरम्यान, वेळीच चोरट्या महिलांना अटक करण्यात आल्याने व अडीच लाखांच्या बांगड्या हस्तगत करण्यात आल्याने पंजाबी परीवाराने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पथकातील कर्मचार्यांचा पोलीस ठाण्यात येवून गौरव केला.