दीपनगरात आता हायड्रोजन निर्मितीसाठी आता ग्रीन एनर्जीचा वापर

भुसावळ : राज्यातील अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य गृहिणींपासून देशाचा अन्नदाता शेतकर्‍यांपर्यंत मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. भुसावळातील दीपनगर प्रकल्पासाठीही त्यात तरतूद करण्यात आली आहे. दीपनगरात वीज निर्मिती प्रक्रियेत कोळसा जाळल्यानंतर त्यातून हायड्रोजन व ऑक्सीजन वायू वेगळे करण्यासाठी यापूर्वी विजेचा वापर केला जात असलातरी आता यात सौर उर्जेचा (ग्रीन एनर्जी) वापर केला जाणार असून त्यासाठी 15.7 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट असून तो यशस्वी झाल्यास राज्यातील अन्य प्रकल्पातही या पद्धत्तीचा वापर केला जाईल, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.

रोजगार निर्मिती नसलीतरी विजेत होणार बदल

वीज निर्मितीच्या प्रक्रियेत कोळसा जाळला असताना त्यातून हायड्रोजन, ऑक्सीजन आदी बाहेर पडण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया राबवली जाते व त्यासाठीदेखील विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो मात्र आता सोलर यंत्रणेच्या माध्यमातून विजेची बचत केली जाणार असून त्या माध्यमातून खर्चातही मोठ्या प्रमाणावर कपात केली जाणार आहे. 500 केव्ही (किलो वॅट) हा सोलर प्रकल्प असून त्यातून जी वीज निर्मिती होईल ती हायड्रोजन सेपरेशनसाठी वापरली जाणार आहे. या माध्यमातून कुठलीही नवीन रोजगार निर्मिती होणार नसलीतरी प्रकल्पाच्या विजेसह खर्चात मोठी बचत होणार आहे. राज्यातील पायलट प्रोजेक्ट म्हणून याकडे पाहिले जात असून त्याच्या यशानंतर राज्यातील अन्य प्रकल्पातही ग्रीन एनर्जीचा वापर शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.