जळगाव : राज्यात बऱ्याच ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गुरुवारी झालेल्या पावसामुळे अमळनेरच्या बोरी नदीला पूर आला. यामुळे तब्बल चार गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. यामध्ये सात्री, कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द तर पारोळा तालुक्यातील भिलाली या गावांचा समावेश आहे.
राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने गुरुवार, २१ रोजी रात्री हजेरी लावली. त्यामुळे अमळनेरच्या बोरी नदीला मध्यरात्री पूर आला. रात्री प्रवाहाचे प्रमाण जास्त असल्याने भिलाली येथील पुलावरून पाणी वाहत होते.
कन्हेरे येथील पुलावरून दोन तीन फूट पाणी वाहत असल्याने सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे ,फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता. अमळनेर तालुक्यातील सात्री गाव जणू काही शापित आहे. पूल आणि रस्ता नसल्याने या गावाचा संपर्क जगाशी तुटतो. नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शाळेत पोहचू शकले नाहीत तर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अमळनेरला येऊ शकले नाही. ग्रामसेवक, तलाठी देखील गावात पोहचू शकले नाही.