इंफाळ : मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. संतप्त जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा संघर्षाची परिस्थिती पाहायला मिळाली. थौबल जिल्ह्यात जमलेल्या शेकडो जमावाने इंडियन रिझर्व्ह बटालियन कॅम्पवर हल्ला करून याठिकाणी ठेवलेली शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. यादरम्यान जवान आणि जमावामध्ये चकमकही पाहायला मिळाली, यात एकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत भारतीय लष्कराकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. शेकडोच्या संख्येने जमलेल्या जमावाने सैनिकांची हालचाल रोखण्यासाठी आधी रस्ते अडवले होते. मात्र, आसाम रायफल्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या अतिरिक्त तुकडीच्या मदतीने आणि संयुक्त प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली, असे निवेदनात म्हटले आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्याचे सांगण्यात येत आहे.