Assembly Election 2024 । नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर; आघाडीत दावेच दावे

#image_title

नंदुरबार । विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत जिल्ह्यात दोन ठिकाणी उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उमेदवार तर सोडा पण जागा कुठल्या पक्षासाठी सुटेल याबाबतचा तिढा कायम असल्याने त्याकडे लक्ष लागून आहे.

महायुतीत अक्कलकुवा कुणाकडे ?
जिल्ह्यात आता नंदुरबार आणि शहादा मतदारसंघ महायुती मध्ये भाजप लढणार असल्याचे स्पष्ट आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांनी विद्यमान आमदारांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय नवापूरची जागा महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर अक्कलकुवाची जागा शिंदे सेना की राष्ट्रवादी अजित पवार गट याबाबत रस्सीखेच सुरू आहे. हा प्रश्न उद्यापर्यंत मिटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आघाडीत दावेच दावे
महाविकास आघाडीत मात्र अजूनही खलबते सुरु आहेत. चारही जागांवर काँग्रेसने दावा केला असून उमेदवारांच्या मुलाखती ही घेतल्या आहेत. मात्र आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव सेना यांनीही दावा केल्याने जागा वाटपाचा तिढा कायम आहे. काँग्रेसचे जिल्ह्यात अक्कलकुवा व नवापूर या मतदारसंघात आमदार असून या दोन्ही ठिकाणी पुन्हा त्यांनाच पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. शहाद्याच्या जागेवरही काँग्रेसने प्रबळ दावा केला आहे

नंदुरबारच्या जागेबाबत मात्र काँग्रेस आणि उद्धव सेना यांनी दावे केले असून राष्ट्रवादी शरद पवार गटानेही दावा केला आहे, नव्हे तर तिन्ही पक्षातील इच्छुकांनी यापूर्वीच फलक लावून आपली भूमिका जाहीर केली होती. सोशल मीडियावर देखील तिन्ही उमेदवार सक्रिय झाले असून आपापल्या उमेदवारीचे दावे करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे नेमक्या कोणत्या पक्षाला जागा सुटणार व कोणाला उमेदवारी मिळेल याकडे लक्ष लागून आहे.