जळगाव तरुण भारत लाईव्ह | १० डिसेंबर २०२२ | पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांसाठीही संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला दिली. पोलीस खात्यातील भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२२ आहे. १३ डिसेंबरपर्यंत वेबसाइटवर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्यात येईल. नियमावलीत सुधारणा करण्यात आल्यानंतर तृतीयपंथीयांची शारीरिक चाचणी केली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल.
पोलीस खात्यातील भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी तरतूद करण्याबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान, तृतीयपंथीयांसाठी व्यक्तीच्या नियुक्तीबाबत नियम न बनवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी फटकारले होतं. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी तृतीयपंथी अर्ज करू शकतात. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. तृतीयपंथी शारीरिक चाचणीशी संबंधित निकषांशी संबंधित नियम फेब्रुवारी २०२३ पर्यंत तयार केले जातील, असे आश्वासनही न्यायालयाला दिले आहेत.