हत्यारे घेऊन निघाले, फसले पोलीसांच्या जाळ्यात

शिरपूर : इंदूर येथून विविध हत्यारे घेवून धुळ्याकडे जाणाऱ्या टोळीला शिरपूर तालुका पोलिसांनी गुरुवारी दुपारी पकडले. या कारवाईत दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील हत्यारे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतपाल गिरधर सोनवणे (रा.लळींग), किरण नंदलाल मराठे (रा.जुन्नर), विकास देवा ठाकरे, सकाराम रामा पवार दोघे (रा.लळींग), सचिन राजेंद्र सोनवणे (रा.अवधान), राजू पवार, अमोल शांंताराम चव्हाण, संतोष नामदेव पाटील तिघे (रा.जुन्नेर), विशाल विजय ठाकरे, विठ्ठल हरबा सोनवणे दोघे (रा.लळींग) असे अटक संशयितांचे नावं आहे.

शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना पांढर्‍या रंगाच्या कारमधून काही जण इंदूरकडून धुळ्याकडे शस्त्रसाठा घेवून जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि शिरसाठ यांच्यासह पथकाने हाडाखेड तपासणी नाक्याजवळ नाकाबंदी केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयीत कार (क्र.एमएच 04 एफ.झेड. 2004) हाडाखेड तपासणी नाक्याजवळ येताच पोलिसांनी तिला रोखले. कारमधील दहा संशयीतांना खाली उतरवुन कारची तपासणी केली असता त्यात 12 तलवारी, दोन गुप्त्या, एक चॉपर बटन घडीचा चाकू, दोन फाईटर अशी हत्यारे मिळून आली.

पोलिसांनी हत्यारांसह कार असा 6 लाख 29 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कारमधील दहाही जणांना ताब्यात घेतले. सतपाल गिरधर सोनवणे (रा.लळींग), किरण नंदलाल मराठे (रा.जुन्नर), विकास देवा ठाकरे, सकाराम रामा पवार दोघे (रा.लळींग), सचिन राजेंद्र सोनवणे (रा.अवधान), राजू पवार, अमोल शांंताराम चव्हाण, संतोष नामदेव पाटील तिघे (रा.जुन्नेर), विशाल विजय ठाकरे, विठ्ठल हरबा सोनवणे दोघे (रा.लळींग) यांच्याविरोधात भारतीय हत्त्यार कायदा कलम 4/25 सह मुंंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.