तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरात बाहेरगावाहून येणार्या कोणत्याही व्यक्तीला स्वस्त दरात शुद्ध, स्वच्छ, स्वादिष्ट आणि पोषक अन्न मिळावे या उद्देशाने ३१ वर्षांपूर्वी ९ जून, १९९२ रोजी प्रारंभ झालेल्या क्षुधाशांती झुणका भाकर केंद्र ते श्री क्षुधाशांती सेवा संस्था असा प्रवास केलेल्या उपक्रमाने या कालावधीत सुमारे एक कोटीहून अधिक लोकांना ‘तृप्ती’चा आनंद दिला असून आजही ही ‘अन्नपूर्णा’ अशीच कार्यरत आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मातृह्दयी डॉ. अविनाश आचार्य दादा आणि प्रख्यात सुवर्ण व्यवसायी व ‘शाकाहार सदाचार’ अभियानाने पुरस्कर्ते रतनलाल बाफना यांच्या चिंतनातून निर्णय झाला अन् केशवस्मृती प्रतिष्ठान व आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून, १९९२ रोजी डॉ.आचार्य कॉम्प्लेक्समधील एका छोट्याशा जागेत क्षुधाशांती झुणका भाकर केंद्राचा केवळ ४ महिला कर्मचार्यांसह प्रारंभ झाला. त्यावेळी व्यवस्थापक म्हणून विश्वास कुलकर्णी यांनी मोलाची जबाबदारी बजावली होती. अमळनेर येथील संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांचे लाभलेले आशीर्वाद फलदायी ठरले अन् या केंद्राची विश्वासार्हता दिवसागणिक वाढत गेली व ती आजतागायत तशीच कायम आहे.
दोन रुपयात झुणका भाकर
प्रारंभी दोन रुपयात दोन पोळ्या किंवा एक भाकर आणि भाजी वा ठेचा असे शुद्ध, स्वच्छ आणि चवदार अन्न मिळायचे. त्या काळात सुंदराबाई पाटील आणि विमलबाई चौधरी यांनी दिलेल्या योगदान मोठे आहे. प्रारंभी महिन्याला ९०० पॅकेटसची विक्री व्हायची. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला. जळगाव शहरात अद्योग, व्यवसाय, खरेदी-विक्री वा अन्य कामासाठी बाहेरुन येणार्यांना येथे अत्यल्प दरात चविष्ट अन्न मिळू लागल्याने त्याची सर्वदूर चर्चा व्हायची. त्यातून व्यवसाय वाढला. १९९४ पर्यंत केंद्र सुस्थापित झाले. कर्मचार्यांची संख्याही ३०-३५ पर्यंत पोहचली. त्यामुळे नगरपालिकेच्या सहयोगाने नवीन एस.टी.स्टँडजवळील सध्याच्या प्रशस्त जागेत केंद्राचे स्थलांतर झाले. त्यामुळे बाहेरुन येणार्या प्रवाशांसोबतच एस.टी.च्या चालक आणि वाहकांनाही अत्यल्प दरात उत्तम भोजनाची सुविधा उपलब्ध झाली. अनेकांनी घरुन डबा आणण्याऐवजी येथील सुविधेची लाभ घेतला, आजही घेत आहेत. केवळ ३० रुपयात चविष्ट व वरण, भात, पोळी, भाजी येथे मिळू शकते. पार्सल लागल्यास ४ रु.अतिरिक्त लागतात.
‘सॅण्डविच’ भाकर ठरली विशेष!
बदलत्या काळानुसार आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन या केंद्राने वेळोवेळी तसे पदार्थ उपलब्ध करुन दिले. त्यातील एक म्हणजे ‘सॅण्डविच’ भाकर. तिची एकदा चव घेणार्याला ती पुन्हा-पुन्हा आवडावी हेच तिचे यश आहे. ती आधी १५ रु.ला तर आता २० रुपयाला मिळते. तसेच नाश्त्यामध्ये आलूवडा मटकी रस्सा आपले वैशिष्ट्य राखून आहे. चव, दर्जा, स्वच्छता आणि पोषणमूल्य यामुळे या केंद्राद्वारे बाहेरील ऑर्डरही घेतल्या जातात. ज्यांची संख्या बरीच वाढली आहे. सणासुदीला वेगवेगळे पदार्थ उपलब्ध असतात. जसे-श्रावण महिन्यात दालबट्टी तर दिवाळीत विविध फरसाण अत्यंत रास्त दरात उपलब्ध असते. त्याला ग्राहकांची मागणीही चांगली असते. याचदरम्यान २०१० ला या केंद्राचे नाव बदलून ते श्री क्षुधाशांती सेवासंस्था असे करण्यात आले. कारण तोपर्यंत केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गतच्या प्रकल्पांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.
सेवाभावी प्रमुखांची परंपरा
कोणत्याही प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी आणि सहकारी जसे कार्यनिष्ठ असावे लागतात असेच प्रमुखही आदर्श निर्माण करणारे हवे असतात. केशवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश आचार्य दादा हे जसे आदर्श व्यक्तिमत्व होते, त्याचप्रमाणे ‘केशवस्मृती’च्या सर्व प्रकल्पांना लाभलेले प्रमुखही ही सेवाभावाची परंपरा अधिक यशाकडे घेऊन जाणारे आहेत. त्यात विद्यमान अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्यासह पूर्व विश्वस्त प्रख्यात सुवर्ण व्यवसायी रतनालाल बाफना, वसंतराव शर्मा, बाळासाहेब बेहेडे, कमलेशभाई दोशी, अविनाश शर्मा, प्रमोद मोघे, सुरेश केसवाणी, पहलाज हासवाणी, नाना उपाध्ये, सतीश वाणी, सतीश मदाने, श्यामसुंदर झंवर, दिलीप चोपडा, संजय बिर्ला आणि सुनील याज्ञिक आदींचा उल्लेख करावा लागेल. या सर्वांनी या केंद्राची आर्थिक भरभराट करण्यासाठी योजना आखल्या आणि त्यांची सफल अंमलबाजावणीही केली. व्यावसायिक दृष्टिकोन वाढवला. बेहेडेकाकाजी तर केवळ वासावरुन पोळी किंवा भाजी करपत असल्याचे सांगायचे. भाजीची चव स्वतः घेतल्यानंतरच ती ग्राहकांना वाढायची की नाही याचा निर्णय ते देत. कुणाही जे द्यायचे ते उत्तमच द्यायचे अशी त्यांची भूमिका होती. त्यात आजही बदल झालेला नाही.
कर्मचार्यांचे योगदानही मोठे
या केंद्राच्या सुरुवातीपासूनच कर्मचार्यांनी आपल्या परिवाराप्रमाणे अतिशय मनापासून येथे काम करतांना समोरच्या ग्राहकाला उत्कृष्ट, चवदार भोजन देण्याचा कायम प्रयत्न केला. सध्या केंद्रात २७ कर्मचारी असून त्यात १७ महिला व १० पुरुष आहेत. यातही विशेष म्हणजे ३ पुरुष आणि २ महिला सहकारी दिव्यांग आहेत.
सुविधांचा लाभ
येथील कर्मचार्यांना विविध शासकीय सुविधांचा लाभ जसा मिळवून दिला जातो त्याचप्रमाणे विविध प्रकल्पांचीही वेळोवेळी मदत होते. ‘परिवार’ संकल्पनेमुळे सुख, दुःखात सर्वजण पाठीशी असतात. हा विश्वास आणि संस्कारही खूप मोलाचा आहे. दरवर्षी गणवेश आणि आरोग्य तपासणी याकडे विशेष लक्ष दिले जाते.
मान्यवरांशी भेट
या काळात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून येथील चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद लुटला आहे. त्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबतच अनेक कलावंत आणि शासकीय अधिकार्यांचाही समावेश होता. प्रामुख्याने उल्लेख करायचा तर अभिनेते नाना पाटेकर, माजी जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर आदींचा करता येईल.
कोरोना काळात लक्षणीय काम
कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्ती काळात केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्या चतुरस्त्र मार्गदर्शनानुसार श्री क्षुधाशांती सेवा संस्थेने गरजूंना फूड पॅकेटस्, किराणा पॅकेटस्चे शहरातील वेगवेगळ्या भागात जावून वितरण केले होते. कारण त्यावेळी हॉटेल्स तसेच किराणा दुकानेही बंद असल्याने अनेकांची खूप गैरसोय झाली. ती या संस्थेने आपल्यापरीने दूर करण्याचा प्रयत्न केला. जनसामान्यांची भूक भागवतांना आजूबाजूच्या लोकांची तृष्णा भागविण्याचे काम जळगाव जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने वॉटर कुलर बसवून यावर्षीपासून क्षुधाशांतीने प्रारंभ केले आहे.
दररोज सुमारे १००० ते १५०० जण येथे भेट देतात. त्यादृष्टिने गेल्या ३१ वर्षात एक कोटीहून अधिक लोकांनी येथे तृप्ततेचा अनुभव घेतला असावा, असे नक्कीच म्हणता येईल. केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे प्रमुख भरतदादांच्या नेतृत्वाखाली हा ‘अन्नपूर्णा’ यज्ञ असाच अविरत समाजाची सेवा करीत राहील, असा विश्वास आहे. हीच वर्धापनदिनी शुभकामना !