Income Tax Department : देशभरात आयकर विभागाचं धाड सत्र सुरू असून म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावराही छापा टाकल्याची माहिती आहे. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क आंब्याच्या झाडावर एका पेटीत लपून ठेवलेले तब्बल एक कोटी रुपये जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयकर विभागाला आंब्याच्या झाडावर ही रक्कम प्राप्त झाली, त्यामुळे आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. आंब्याच्या झाडावरील पेटीत त्याने पैसे लपवून ठेवले होते. एक कोटींची रोकड जप्त केल्यानंतरही आयटी अधिकाऱ्यांचे धाडसत्र सुरूच आहे. आयटीच्या छाप्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आयटी अधिकारी आंब्याच्या झाडाच्या फांदीवर ठेवलेल्या बॉक्सवर लक्ष केंद्रित करून काही चौकशी करत असल्याचे दिसून येते.
हा बॉक्स उघडला असता त्यात एक कोटी रुपयांच्या नोटा आढळून आल्या. यापूर्वी भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तर त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून दोन कोटींहून अधिक रोकडही जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आमदार पुत्र प्रशांत मदाल याला अटक करण्यात आली. घरातून आठ कोटी जप्त झाल्यानंतर त्यांनी कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.