---Advertisement---
जामनेर, प्रतिनिधी : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी, तारा, शेतातील झटका मशीन यासह सोलरच्या महागड्या प्लेट चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने तहसीलदार, पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार आणि महावितरण विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी तीन-तीन वेळा चोरीला गेल्या असून, त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
चोरीच्या घटनांवर नियंत्रण नाही
संघाने आरोप केला आहे की, पोलिसांच्या त्रिपाठी गस्तीवर असूनही चोरीच्या घटना थांबत नाहीत. रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर गस्त कमी असल्याने चोरट्यांचे धाडस वाढले आहे.
प्रशासन व पोलिसांची निष्क्रियता
संघाने प्रशासन व पोलिसांवर कठोर कारवाईचा अभाव असल्याची टीका केली आहे. दिवसा गस्त वाढवावी, रात्री गावोगाव पोलिस पथकाची उपस्थिती ठेवावी तसेच MSEB विभागाने फेज लाईट बंद करून कारवाई करावी, अशी मागणी संघाने केली आहे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून चोरट्यांना पकडावे, गावागावांत रात्री गस्त वाढवावी आणि विजेच्या मोटारींच्या चोरीवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.









