मनपा शाळांची पटसंख्या वाढवा!

 तरुण भारत लाईव्ह ।१९ जानेवारी २०२३। शहरातील पाच वर्षात बंद पडलेल्या शाळांचा विषय लक्षात घेता. नुकताच शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीवर जोर देण्यात आला असून पालकांशी संवाद साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीस शाळेतील प्रशासन अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह मुख्याध्यापक उपस्थित होते.

16 जानेवारी रोजी पाच वर्षात मनपाच्या तब्ब्ल 20 शाळा बंद ! डिजिटल शाळेचे स्वप्न अधुरे, गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळेना या मथळ्याखाली ‘तरूण भारत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत नुकताच शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त गोराणे यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. यात शहरातील शाळेचे 25 मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. तर ही पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थाना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या, यासाठी पालकांच्या बैठका घ्या, क्रीडा विषयात आवड असलेल्या विद्यार्थाना वाव द्या, विद्यार्थांना संगणकाचे ज्ञान द्या, विद्यार्थांना प्रोत्साहन मिळेल अशाच क्रीडा, कला, स्पर्धेचे आयोजन करा. यासाठी प्रथमता शिक्षकांनी वेळेवर येणे गरजेचे आहे. यापुढे जे शिक्षक वेळेत येणार नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. शहरात असलेल्या आजारांना लक्षात घेता शाळेत सर्वत्र स्वच्छता ठेवा, शाळेतील दरवाचे, खिडक्या दुरुस्त करून घ्या. विद्यार्थांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार द्या, त्याचा दर्जा स्वतः शिक्षकांनी तपासा, शुद्ध पाणी द्या. विद्यार्थ्यांची काळजी घ्या अशाही सूचना देण्यात आल्या.

शहरात 23 प्राथमिक शाळा, 5 माध्यमिक शाळा, 12 मराठी शाळा, 10 उर्दू शाळा व एक हिंदी शाळा आहे. यात गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी ज्या ज्या उपाय योजना महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला आखता येतील त्या सर्व गोष्टी यासाठी करा. शेवटी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 5 शिक्षक कार्यान्वित आहे. यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत इतर शिक्षकांना प्रशिक्षण देत, विद्यार्थाना रोजच्या रोज स्पीच थेरपी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

रिक्त पदांची माहिती द्या

ज्या शाळेंमध्ये शिक्षकांचे पद रिक्त असेल त्यांची माहिती एकत्र करून ती लवकरच सादर करावी. बिंदुनामावलीसाठी या माहितीची आवश्यकता असल्याने याबाबत त्वरित माहिती एकत्र करा. यामाध्यमातून नवीन शिक्षक आले की शिक्षकांचा व शिक्षणाचा दर्जा सुधारेल.