युटीएस अ‍ॅपकडे रेल्वे प्रवाशांचा वाढता कल : नाशिककर पहिल्या स्थानी

Increasing trend of rail passengers towards UTS app : Nashikkar tops the list भुसावळ (गणेश वाघ) : रेल्वेच्या तिकीट खिडकीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने एटीव्हीएम मशीनसह आता युटीएस (अनरीझर्व्ह तिकीट सिस्टीम) अ‍ॅपचा पर्याय पुढे केला आहे. वापरण्यास सहज व सुलभ असलेल्या या अ‍ॅपद्वारे जानेवारीच्या पंधरवड्यात भुसावळ रेल्वे विभागाला आठ लाखांचे उत्पन्न मिळाले असून तिकीट छपाईच्या खर्चात बचत झाली आहे. युटीएस अ‍ॅप वापरात नाशिककर रेल्वे प्रवासी प्रथमस्थानी तर अकोला व जळगावकर द्वितीय व तृतीयस्थानी असल्याचे दिसून आले आहे. 1 ते 17 जानेवारीदरम्यान आठ हजार 176 तिकीट विक्रीच्या माध्यमातून सात लाख 96 हजार 335 रुपयांचे उत्पन्न भुसावळ रेल्वे विभागाला मिळाले आहे.

प्रवाशांच्या वेळेत झाली बचत
रेल्वे तिकीट खिडकीवर प्रवाशांच्या वाढत्या रांगामुळे अनेकदा रेल्वे प्रवाशांची रेल्वेदेखील चुकते तर अनेकदा तिकीट हरवण्याचीदेखील भीती असते मात्र प्लेस्टोरवरून सहज डाऊनलोड होणार्‍या युटीएस अ‍ॅपमध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर डिजिटल माध्यमातून तिकीट सहज उपलब्ध असल्याने प्रवाशांचा तिकीट खिडकीवर उभे राहण्याचा ताण वाचतो शिवाय रेल्वेच्या कागदातदेखील मोठ्या प्रमाणावर बचत होत असल्याने रेल्वेच्या उत्पन्नात अधिकाधिक वाढ होत आहे.

जळगावकर तृतीय स्थानी
युटीएस अ‍ॅप वापराबाबत नाशिककर प्रवासी अग्रस्थानी आहेत तर अकोला व जळगावकर अनुक्रमे द्वितीय व तृतीयस्थानी आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार गत पंधरवड्यात अकोल्यातील एक हजार 899, अमरावती 474, बडनेरा 838, भुसावळ 909, जळगाव एक हजार 406, मनमाड एक हजार 322, नाशिक तीन हजार 52 व खंडवा येथील 406 प्रवाशांनी युटीएस अ‍ॅपद्वारे तिकीट काढल्याने त्यातून रेल्वेला सात लाख 96 हजार 335 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

अधिकाधिक प्रवाशांनी करावा अ‍ॅपचा वापर
डिजिटल तिकीट विक्रीला युटीएस अ‍ॅपद्वारे प्रोत्साहन मिळाले असून या माध्यमातून रेल्वेच्या तिकीट खर्चातचही निश्चित बचत झाली आहे. वापरण्यास अत्यंत सुलभ असलेल्या युटीएस अ‍ॅपद्वारे डिजिटल तिकीट मोबाईलमध्ये असल्याने तिकीट हरवण्याची भीती नाही शिवाय त्यामुळे तिकीट खिडकीवर आता रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याचे वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे म्हणाले.