IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस क्रिकेट रसिकांसाठी रोमांचक ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सॅम कोनस्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी उत्तम भागीदारी करत मजबूत सुरुवात दिली. विशेषतः कोनस्टासने जसप्रीत बुमराहच्या चेंडूंवर दोन षटकार ठोकून स्वतःचा हेतू स्पष्ट केला.
भारतीय गोलंदाजांना काही वेळ संघर्ष करावा लागला, पण रविंद्र जडेजाने पहिली विकेट घेत पहिला ब्रेकथ्रू दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मार्नस लाबुशेनला वॉशिंग्टन सुंदरने बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. मात्र, सर्वात मोठा क्षण होता जसप्रीत बुमराहने ट्रेव्हिस हेडला शून्यावर बाद केलेला. हेडने मागील सामन्यातील कामगिरीनंतर मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, परंतु बुमराहच्या अचूक चेंडूने त्याला वेल लेफ्ट करण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत केले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या शेवटी 300 धावांच्या पुढे पोहोचत सामन्यावर पकड मिळवली आहे. भारतीय गोलंदाजांनी काही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या असल्या तरी ऑस्ट्रेलियाचा धावांचा वेग रोखणे कठीण ठरले. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला लवकर ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना बाद करून फलंदाजीसाठी सज्ज होणे आवश्यक आहे.
शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे, तर रोहित शर्मा ओपनिंग करणार आहे. आता भारतीय फलंदाजांकडून ठोस कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करताना भारतीय फलंदाज कसे तोंड देतात, याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.