भारतीय क्रिकेट संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुढील मालिकेपूर्वी एक मोठी मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मॉर्केलने याआधीही गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केले आहे.
क्रिकबझच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, मोर्ने मॉर्केल हे टीम इंडियाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. 1 सप्टेंबरपासून ते आपली जबाबदारी स्वीकारतील. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये जवळपास 550 बळी घेतलेल्या मॉर्केलने यापूर्वी काही संघांसोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर आपल्या आवडीचा सपोर्ट स्टाफ मिळावा, अशी अट ठेवली होती. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि शक्यतांनंतर अखेर त्यांचा स्टाफ पूर्ण झाला आहे. याआधीही बोर्डाने नेदरलँडचा माजी फलंदाज रायन तेंडोशकाटे आणि माजी भारतीय फलंदाज अभिषेक नायर यांची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर हे प्रकरण फक्त गोलंदाजी प्रशिक्षकावरच अडकले आणि गंभीरला या भूमिकेसाठी फक्त मॉर्केल हवा होता, ज्यासाठी सुरुवातीला बीसीसीआयला फारसा रस वाटला नाही. अखेर, गंभीरच्या सल्ल्यानुसार बोर्डाने दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाची नियुक्ती केली आहे.