IND vs BAN, 1st Test : बांगलादेशविरुद्ध अनुभवालाच प्राधान्य ?

नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल या दोन युवा प्रतिभावान खेळाडूंना संघात स्थान मिळाले असले, तरी प्रत्यक्ष मैदानावर अंतिम ११ खेळाडूंचा संघ उतरवताना अनुभवालाच प्राधान्य दिले जाईल, असेच चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

केएल राहुल आणि ऋषभ पंत दोघेही जायबंदी असताना इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत फलंदाज म्हणून सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेलने सर्वांना प्रभावित केले होते. दोघांचीही कामगिरी भारतीय संघाच्या यशात निर्णायक ठरली होती. मात्र, आता राहुल आणि पंत दोघांचेही संघात आगमन झाल्यामुळे सर्फराज आणि ध्रुव यांना अंतिम अकरात स्थान मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा मतप्रवाह जोरदार चर्चेत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुलला वगळण्यात आले नव्हते. तो शंभर टक्के तंदुरुस्त नव्हता. त्याने तंदुरुस्तीसाठी वेळ मागितला होता. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. पंतही अपघातात जायबंदी झाल्यामुळे संघाबाहेर होता. त्यानंतर दोघांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि सध्या सुरू असलेल्या दुलीप करंडक स्पर्धेदरम्यान आपली योग्यता दाखवून दिली आहे.

त्यामुळेच बांगलादेशविरुद्ध अनुभवाला पसंती दिली जाईल असे मंडळाच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. फिरकी गोलंदाजीसाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यातच स्पर्धा असेल. नुकत्याच झालेल्या दुलीप करंडक स्पर्धेतील सामन्यात दोघांनाही फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. यामुळे फिरकी गोलंदाजाच्या निवडीसाठी अनुभव हाच मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.