नागपूर : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी 20I मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेचा थरार थोड्याच वेळात रंगणार आहे. पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. इंग्लंडने सामन्याआधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे, तर भारतीय संघाच्या अंतिम अकराच्या निवडीबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. विशेषतः केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यात कोणाला संधी मिळणार, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत सांगितले की, संघ व्यवस्थापनासाठी राहुल आणि पंत यांच्यात निवड करणे ही एक “चांगली डोकेदुखी” आहे. “केएल राहुल गेल्या काही वर्षांपासून विकेटकीपिंग करत आहे आणि त्याने चांगली कामगिरीही केली आहे. त्याने गेल्या 10-15 सामन्यांमध्ये संघासाठी चांगली भूमिका बजावली आहे. तसेच, ऋषभ पंतही संघात परतला आहे आणि सामना जिंकून देण्याची क्षमता दोघांमध्ये आहे. कोणाला संधी द्यायची याबाबत आम्ही विचार करतोय,” असे रोहितने स्पष्ट केले.
वरुण चक्रवर्तीला संधी
फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 14 विकेट्स घेत प्रभावी प्रदर्शन केले. या शानदार खेळीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला एकदिवसीय मालिकेतही संधी मिळाली आहे. रोहित शर्माने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वरुणने निश्चितच काही तरी वेगळं करुन दाखवलं आहे. त्याने जरी हे टी 20I क्रिकेटमध्ये केलं असेल, तरीही त्याच्यात काहीतरी विशेष आहे. आम्हाला एक पर्याय हवा होता आणि आम्ही त्याच्यासोबत काय करू शकतो, हे पाहायचं आहे.”
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.
इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका अत्यंत रोमांचक ठरणार आहे. दोन्ही संघ प्रबळ असून, पहिल्या सामन्यात कोणता संघ आघाडी घेणार, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.