दुबई : सलग दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया आज न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळत आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकला असून, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय फलंदाजांसमोर मिचेल सेंटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांचे आव्हान असेल. जी या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वांत कठीण परीक्षा असेल दोन्ही किवी फिरकी गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि दुबईच्या खेळपट्टीतर ते अधिक प्रभावी ठरू शकतात.
फॉर्मात असलेला शुभमन गिल, पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावणारा विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांना न्यूझीलंडच्या फिरकीपटूंविरुद्ध प्रभावी कामगिरी करावी लागेल. स्पर्धेपूर्वी संघात पाच फिरकीपटू निवडल्याबद्दल भारतावर टीका होत होती; परंतु येथे फिरकीपटूंच्या वर्चस्वामुळे भारताला बळकटी मिळाली आहे.
दरम्यान, टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी चिंताजनक आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टीम इंडिया आणि न्यूझीलंड फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने हा एकमेव सामना जिंकला होता. त्यामुळे आज टीम इंडियाचा हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करते का ? हे पाहावं लागणार आहे. तसेच आज, रविवार असल्याने चांगल्या सामन्यासाठी गर्दी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.