IND vs NZ : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंतच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. रोहितसेनेने पहिल्या सामन्यात बांगलादेशवर सहज विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. आता ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुबईमध्ये होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी त्याला विश्रांती देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुभमन गिलकडे दिली जाऊ शकते.
गिलकडे नेतृत्वाचा अनुभव आहे. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सांभाळतो आणि 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. बीसीसीआयने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी उपकर्णधार म्हणूनही नियुक्त केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून संधी मिळाल्यास, गिल आपल्या नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवण्यास उत्सुक असेल.
ऋषभ पंत किंवा वॉशिंग्टन सुंदरला संधी?
रोहित शर्माने विश्रांती घेतल्यास, त्याच्या जागी ऋषभ पंत किंवा वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. ऋषभ पंतने अलीकडच्या काळात पुनरागमन केल्यानंतर दमदार कामगिरी केली आहे. तर वॉशिंग्टन सुंदर हा अष्टपैलू खेळाडू आहे.
शुभमन गिलने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मॅचविनिंग खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने 46 धावांची महत्त्वाची खेळी साकारली. आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने 147 च्या सरासरीने 147 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.
न्यूझीलंडविरुद्ध विजयासाठी टीम इंडिया सज्ज
न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा असेल. सेमीफायनलपूर्वी हा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. शुभमन गिलला कर्णधारपदाची संधी मिळाल्यास, तो आपल्या फलंदाजीसह नेतृत्व कौशल्याचेही प्रदर्शन करू शकेल. 2 मार्च रोजी दुबईच्या हिरवळीवर हा थरारक सामना रंगणार असून, क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेला आणखी उधाण आले आहे.