IND vs SA: पहिल्या कसोटीत रोहितसोबत कोण करणार डावाची सुरुवात?

IND vs SA:  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा सामना २६ डिसेंबर रोजी सेंच्युरियनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू कमबॅक करताना दिसून येणार आहेत. तर प्रसिद्ध कृष्णाला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
भारतीय संघाला ही मालिका जिंकून इतिहास रचायची संधी असणार आहे. कारण आजवर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला कसोटीत दक्षिण आफ्रिकेत जाऊन पराभूत करू शकलेला नाही. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठे धक्के देखील बसले आहेत. संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसल्याने मालिकेतून बाहेर झाला आहे.

तर ईशान किशनने वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून माघार घेतली. ईशान किशन बाहेर झाल्यानंतर केएस भरतचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

रोहितसोबत सलामीला कोण?

रोहित शर्मासोबत सलामीला कोण जाणार हा अजूनही चर्चेचा विषय आहे. या मालिकेतही युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. तर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजीला येऊ शकतो. विराट कोहली ४, श्रेयस अय्यर ५ आणि केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो

प्रसिद्ध कृष्णा करणार पदार्पण?

या सामन्यात शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसून येऊ शकतात. मोहम्मद शमी संघाबाहेर झाल्याने प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे प्रमुख गोलंदाज असतील.

अशी असू शकते प्लेइंग ११

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा