ind vs sl 3rd odi : टीम इंडियापुढे २७ वर्षांनंतर मालिका गमविण्याचे संकट

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध २७ वर्षांनंतर पहिल्यांदा मालिका गमविण्याचे संकट भारतीय संघापुढे उभे ठाकले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गमविल्यानंतर आज बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजयासाठी भारतीय फलंदाजांना प्रतिस्पर्धी फिरकी माऱ्यापुढे निर्धास्त होऊन खेळण्याचे अवघड आव्हान असेल.

भारताने हा सामना जिंकल्यास मालिका १-१ अशी बरोबरीत सुटणार आहे. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतावर ही नामुष्की ओढवली. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. कर्णधार रोहित शर्मा वगळता एकही फलंदाज लंकेच्या फिरकीला भक्कमपणे तोंड देताना दिसत नाही. विराट कोहलीने दोन सामन्यात ३८ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात विराटने मोठी खेळी करीत मधल्या फळीला आधार देण्याची गरज असेल. त्यासाठी रोहितसारखे आक्रमक खेळून फिरकी मारा फोडून काढावा लागेल. फिरकीविरुद्ध आक्रमक फटके मारणारा शिवम दुबे, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल नांगी टाकली.

रियान पराग फिरकीपुढे यशस्वी ठरतो. परागची फिरकी गोलंदाजीदेखील भारतीय संघासाठी बोनससारखी ठरेल कारण भारतीय गोलंदाज दोन्ही सामन्यांत श्रीलंकेच्या फिरकीपटूंसारखे भेदक जाणवले नाहीत तिसऱ्या वनडेत शिवम दुबेचे स्थान आसामचा युवा अष्टपैलू रियान पराग घेऊ शकतो. फिरकी गोलंदाजीला यशस्वीपणे तोंड देऊ शकणारा पराग गोलंदाजीतदेखील उपयुक्त आहे.