IND vs SL Final 2023 : मोहम्मद सिराजने लंकेची उडवून दिली पार दैना

आशिया कप स्पर्धेतील 13वा आणि शेवटचा सामना आज भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विजेतेपदाच्या लढतीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होईल, असं वाटत होत. मात्र, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने लंकेची पार दैना उडवून दिलीय.

सामन्याच्या चौथ्या षटकात पाच विकेट घेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लंकेला बॅकफूटवर ढकलेले. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट केले.

चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. निसांकाला दोन तर धनंजयला चार धावा करता आल्या. त्याचवेळी समरविक्रम आणि असलंका यांना खातेही उघडता आले नाही. तत्पूर्वी, बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले होते. परेराला खातेही उघडता आले नाही.