IND vs ZIM : टीम इंडियाने फक्त 24 तासात काढला पराभवाचा वचपा

IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत पहिला सामना जिंकून झिम्बाब्वेने 1-0 ने आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने या पराभवाचा वचपा काढला असं म्हणायला हरकत नाही. 23 वर्षीय अभिषेक शर्मा केवळ एका सामन्यात झिरोवरून हिरो बनला आहे.

पदार्पणाच्या सामन्यात तो खाते न उघडता बाद झाला. पण झिम्बाब्वेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने संस्मरणीय खेळी खेळली आणि शतक झळकावले. या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी करत एक खास विक्रमही आपल्या नावावर केला. त्याने असा पराक्रम केला जो याआधी कोणताही भारतीय खेळाडू करू शकला नाही.

अभिषेक शर्माने 47 चेंडूत शतक झळकावलं. तर ऋतुराज गायकवाडनेही अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाची धावसंख्या 200 च्या पार नेण्यास मदत केली. भारतीय फलंदाजांसमोर एकाही झिम्बाब्वे गोलंदाजांची चालली नाही. त्यामुळे हतबल होण्याशिवाय पर्याय नव्हता. शुबमन गिलची विकेट गेल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर येईल असं वाटत होतं. मात्र त्याच्या उलट चित्र पाहायला मिळालं. अभिषेक शर्माने आपलं अर्धशतक 33 चेंडूत पूर्ण केलं आणि पुढच्या 50 धावा फक्त 13 चेंडूत करून शतक झळकावलं.

आता झिम्बाब्वेचा संघ भारताने दिलेले इतकं मोठं आव्हान गाठणार का ? हा प्रश्न आहे. खरं तरी इतकी मोठी धावसंख्या गाठणं काही शक्य नाही. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघ दडपणाखाली असेल यात शंका नाही. दुसरीकडे, गोलंदाजांना अचूक टप्प्याची आणि बिंधास्तपणे गोलंदाजी करण्यासाठी ही धावसंख्या पुरेशी आहे. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधणार यात शंका नाही.

अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
अभिषेक शर्मासाठी हे शतक अनेक अर्थांनी खास आहे. त्याने हे शतक केवळ दुसऱ्या T20 सामन्यात झळकावले आहे. यासह, तो सर्वात कमी डावात T20I शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम दीपक हुडाच्या नावावर होता. त्याने तिसऱ्या T20I डावातच शतक झळकावण्याचा पराक्रम केला. याशिवाय दुसऱ्या T20I डावात शतक झळकावणारा अभिषेक शर्मा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे.