भारत एक जागतिक उत्पादन केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका भाषणात सांगितले की, भारत ही संभावनांची रोपवाटिका आहे. हे विधान फार अर्थपूर्ण आहे. भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आता उदयाला येत आहे. आमचा देश 140 कोटी लोकांचा देश आहे. जगातील अनेक देश हे म्हातार्‍यांचे देश म्हणून गणले जाऊ लागलेले आहेत. त्यांच्या देशामध्ये खूप मोठी जमीन आहे.

संसाधन आहेत. परंतु याचा उपयोग करणारे, उपभोग घेणारे लोक तेथे नाहीत. अनेक देशांजवळ त्यांचं सैन्य नाही. अनेक देशांजवळ त्यांचे खेळाडू नाहीत. अनेक देशांमध्ये तंत्रज्ञानातील प्रगती खूप झालेली असतानाही तेथे काम करणारे लोक त्यांच्याजवळ नाहीत. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये जगातील ज्या ज्या देशांना मनुष्यबळाची आवश्यकता लागेल त्यांना मनुष्यबळ पुरविणारा देश भारत असणार आहे. आमच्या देशातसुद्धा तंत्रज्ञान प्रगत होत आहे. विद्यार्थी नवनवीन कौशल्य शिकत आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपर्‍यात जेथे जेथे कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असेल तेथे भारतीय विद्यार्थी आपलं कौशल्य देण्यासाठी जाऊ शकतो. जगाच्या लोकसंख्येच्या अंदाजे एक पंचमांश लोकसंख्या आमची आहे. आम्ही इतक्या लोकांना दोन वेळचे जेवण देऊ शकतो. एवढे धान्य आमच्या जवळ आहे. चीनपेक्षाही अधिक कृषीयोग्य भूमी आमच्या जवळ आहे.

जमिनीचा जर योग्य वापर झाला, कृषी क्षेत्रामध्ये अधिक प्रगती झाली तर Global production center भारत अर्ध्या जगाला अन्नधान्य पुरवू शकतो, ही भारताची क्षमता आहे. कोरोनाच्या काळामध्ये विदेश मंत्री जयशंकर हे अमेरिकेतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळेस बोलताना एक अमेरिकन अधिकारी म्हणाले की, भारताने कोरोनाच्या क्षेत्रामध्ये अधिक चांगले काम करण्याची आवश्यकता आहे. त्याला उत्तर देताना जयशंकर म्हणाले होते की, अमेरिकेची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांना भारताने दोन वेळचे जेवण करण्याकरिता अन्नधान्य पुरविले आहे. त्यामुळे भारत व अमेरिका यांची तुलना करणे बरोबर नाही. जगातील अनेक असे देश आहेत जेथे भाजीपालासुद्धा पिकत नाही. शेती विशिष्ट पिकांचीच होते. अशा सर्व देशांसाठी भारत हा एक मोठा निर्यातदार राहू शकतो. भारतामध्ये एकूण 400 पेक्षा जास्त नद्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये केवळ समुद्र असल्यामुळे व नद्या एक तर नाही किंवा फारच कमी असल्यामुळे त्यांना गोड्या पाण्याचा नेहमीच तुटवडा जाणवतो.

भारत अशा देशांना गोडे पाणी पुरवू शकतो. एकेकाळी भारतामध्ये पाणी विकले जात नव्हते; परंतु काळ बदलला आणि आता पाण्याचा खूप मोठा व्यवसाय भारतात उभा राहिला आहे. कोरोनामध्ये चीनची संशयास्पद भूमिका होती. त्यामुळे जगातील अनेक देशांनी आपल्या कंपन्या इतर देशांमध्ये स्थानांतरित करण्याचा विचार केला. त्यांच्यासाठी व्हिएतनाम व भारत असे पर्याय होते. जगामध्ये जर कुठल्याही राष्ट्राला आपले उत्पादन केंद्र स्थापन करायचे असेल तर त्यासाठी आवश्यक जमीन, वीज, पाणी, मनुष्यबळ या सर्व गोष्टींची पूर्तता भारत करू शकतो त्यामुळे त्यांच्यासाठी येणार्‍या काळामध्ये भारत हे एक जागतिक उत्पादन केंद्र राहू शकते. भारताचा सुमारे 21 टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. सात लाख चौरस किलोमीटरपेक्षा अधिक जागेवर जंगल आहे. औषधी वनस्पती, विविध प्रकारचे लाकूड व खनिज संपत्ती यामध्ये भरपूर आहे. जगामध्ये जमिनीच्या आत जे लोखंड सापडते; त्यामध्ये भारतातील लोखंड म्हणजे स्टील हे जगातील सर्वोत्तम स्टीलपैकी एक आहे. त्यामुळे आम्ही ज्या कच्च्या लोखंडाची निर्यात करतो त्याचा एकूण निर्यातीमध्ये मोठा वाटा आहे.काही वर्षांपूर्वी ब्राझीलने भारतातून 3000 देशी वंशाच्या गीर गाई नेल्या होत्या. त्यांचे संवर्धन त्यांनी केले आहे व त्या भरोशावर तेथे गीर गाईंची मोठ्या प्रमाणावर वृद्धी करण्यात आलेली आहे.

गाई कसायाला विकून त्यांचे गोमांस विदेशात निर्यात करण्यापेक्षा जगाला दूध पुरविणार्‍या गाई आम्ही देऊ शकतो. फार पूर्वीपासूनच भारतातील साधुसंत विदेशात जाऊन तेथील लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करीत आलेले आहे. भारताचे अध्यात्म हे अतिशय प्राचीन असून जगाला देण्यासाठी आमच्याजवळ ती खूप मोठी ठेव आहे. जगामध्ये Global production center भारतीय अध्यात्म्याचा अधिक प्रचार-प्रसार करत जगामध्ये आमच्या संस्कृतीचा सन्मान वाढविण्याचे कामही आम्ही करू शकतो. आमच्या कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे हित सुरक्षित होते. त्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजांची पूर्तता कुटुंबामध्ये होत होती. त्याचे आवश्यक सामाजिक शिक्षण कुटुंब व्यवस्थेमध्ये होत होते.

अनेक ठिकाणी आम्हालाच याचा विसर पडल्याचे लक्षात येते. परंतु आजही परिस्थिती आटोक्यात येऊ शकते व जगाला आम्ही कौटुंबिक व सामाजिक संस्कार देऊ शकतो. आम्ही जगाला खूप काही देऊ शकतो, परंतु आम्ही जगाच्या मागे लागल्यामुळे व अंधानुकरण केल्यामुळे अनेक क्षेत्रात आमची पीछेहाट झालेली आहे. या क्षेत्रात आम्हाला ही पीछेहाट भरून काढावी लागणार आहे. त्यामुळे आमच्या देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती, चालीरीती, सण उत्सव, शेती करण्याची पद्धती, जंगले राखण्याची पद्धती, नद्यांचे शुद्धीकरण, जमिनीची उर्वराशक्ती कायम राखणे, विषमुक्त अन्न, प्रदूषणावर नियंत्रण अशी अनेक कामे आम्हाला करावे लागणार आहे.

भारत संभावनांची रोप वाटिका आहे. या रोपवाटिकेत अशा विविध क्षेत्रातील संभावना छोट्या छोट्या स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु या संभावनांचे वटवृक्ष करण्याचे काम आम्हाला सर्वांना मिळून करावे लागेल तेव्हाच भारत जगाला काही देण्यास सक्षम होईल.

– अमोल पुसदकर

(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)