नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज कबड्डीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. सामना सुरू होताच पाकिस्तानी संघाला ४-० ने आघाडी घेण्यात यश आले पण नंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानाला चारीमुड्या चित करत ६१-१४ ने पाकिस्तानचा पराभव केला. सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करून भारत फायनलमध्ये दिमाखदार रितीने प्रवेश केला.
भारताच्या नवीन कुमारने सुपर रेड करून सुरूवातीलाच प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. ११-४ असे गुण असताना पाकिस्तानी संघ पहिल्यांदा ऑलआउट झाला अन् भारताने सरशी घेतली. नवीन कुमारने पाकिस्तानी बचावपटू लोळवून वैयक्तिक १० गुण मिळवले. भारताचे २० गुण असताना शेजाऱ्यांचा संघ दुसऱ्यांदा तंबूत परतला. विशाल भारद्वाजच्या चालाकीमुळे भारताच्या बचावफळी पहिला गुण घेण्यात यश आले.
पहिल्या हाफमध्ये पाकिस्तान तिसऱ्यांदा ऑलआऊट झाला. भारताकडे तेव्हा २५ गुणांची आघाडी होती. पहिला हाफ भारत ३०-५ पाकिस्तान अशा फरकाने संपला. दुसऱ्या हाफमध्ये काहीतरी चमत्कार होईल अशी आशा पाकिस्तानी चाहत्यांना होती. पण भारतीय शिलेदारांनी अष्टपैलू कामगिरी करून सामना एकतर्फी केला. 40-8 अशी गुणसंख्या पाकिस्तान चौथ्यांदा ऑलआउट झाला.
भारताने गुणांचे अर्धशतक झळकावताच पाकिस्तानी संघ पाचव्यांदा तंबूत परतला. दुसरा हाफ संपण्याच्या मार्गावर असताना भारताने विक्रमी ५९ गुण मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहाव्यांदा ऑलआउट करून भारताने विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने पाकिस्तानचा ६१-१४ असा पराभव केला.