VIDEO भारताने पाकिस्तानला धू..धू..धूतलं

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये बोलताना भारतानं पाकिस्तानला दहशतवादी कारवायांवरून परखड शब्दांत खडसावलं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेतील चर्चेदरम्यान बहुपक्षीयता आणि संयुक्त राष्ट्राच्या सक्षमीकरणावर बोलताना पाकिस्तानला धू..धू..धूतलं. ओसामा बिन लादेनला आश्रय देणार्‍यांना किंवा शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला करणार्‍यांना या परिषदेसमोर उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं.

शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला करणार्‍यांना अशा प्रकारच्या समस्यांमुळे निर्माण होणारी परिस्थिती कायमस्वरूपी राहणं हे आपण मान्य करू शकत नाही. अवघ्या जगानं ज्या गोष्टी अस्वीकारार्ह ठरवल्या आहेत, त्यांचं समर्थन करण्याचा मुद्दाच उपस्थित व्हायला नको. एखाद्या राष्ट्राकडून दुसर्‍या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याला पाठिंबा देणंही त्याचाच एक भाग आहे, अशा शब्दात जयशंकर यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.

दरम्यान, जयशंकर यांच्याआधी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित करत द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी यावर उपाय शोधण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी त्याचं लोकशाहीकरण करणं गरजेचं आहे. काश्मीर अजूनही एक प्रलंबित मुद्दा आहे. जर तुम्हाला परिस्थिती सामान्य करायची असेल, तर काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं पारित केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी केली जायला हवी, असं भुट्टो आपल्या भाषणात म्हणाले होते.