भारताला ‘ग्लोबल वॉर्मिंग’ न परवडणारे!

 

वेध

– संजय रामगिरवार

Global warming ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही समस्या अवघ्या जगाला भेडसावत असली आणि त्यामुळे पृथ्वीचे मोठे नुकसान होत असले, तरी भारतासारख्या कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला तर ‘ग्लोबल वॉर्मिंग’ अजिबात परवडणारे नाही.

ओला दुष्काळ आपण बघितलाच आहे. या उन्हाळ्यात कधी नव्हे एवढे तापेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: यावर गंभीरतेने विचार करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. भारताला प्रति टन कॉर्बन उत्सर्जनाने जवळपास 90 डॉलरपेक्षा जास्तीचे नुकसान होत आहे, ही बाब ‘नेचर क्लायमेट चेंज’ यात प्रकाशित अहवालातून समोर आली होती. त्यामुळे भारताने वनांच्या साहाय्याने येत्या 2030 पर्यंत अडीच ते तीन बिलियन कार्बन डाय ऑक्साईडपासून ‘कॉर्बन सिन्क’ तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Global warming ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका अवघ्या जगालाच आहे. ‘आयपीसीसी’च्या ‘स्पेशल रिपोर्ट ऑन ग्लोबल वॉर्मिंग ऑफ 1.5 अंश सेल्सिअस’ असा अहवाल काही वर्षांपूर्वी आला. त्यात स्पष्ट केले होते की, 1.5 अंश सेल्सिअसच्या वर सरासरी तापमान वाढू नये. ते धोकादायक आहे. 2015 ला पॅरिस येथे झालेल्या संमेलनात सरासरी तापमान 2 अंश वाढले तर येथील जलवायू संकटात सापडेल, असा गंभीर इशारा दिला आहे. कार्बन डाय ऑक्साईड, सीएफसी, एचएफसी यांसारख्या वायूच्या नियंत्रणातून हे शक्य आहे. याच वायूंना ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ म्हटले जाते. एव्हाना मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, वाढते औद्योगिकरण आणि अन्य कारणांनी या वायूंना नियंत्रित करणे कठीण होत आहे. या वायूंमुळे सूर्याचा प्रकाश आणि उष्मा नियंत्रित होत असतो. प्रकाश बाहेर टाकला जातो आणि उष्मा शोषून घेतली जाते. त्यामुळे ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ आवश्यकच आहे. मात्र, ते किती प्रमाणात असावे, याचे सूत्र जपले गेले पाहिजे. 1824 मध्ये जोसेफ फोरिअस यांनी हे वायुमंडळ नसते, तर पृथ्वी थंडगार झाली असती आणि येथील जलवायू राहण्यायोग्य नसते, हे वास्तव समोर आणले होते.

पृथ्वीच्या पर्यावरणीय समतोलावर विपरीत परिणाम होत असल्याने Global warming ‘ग्लोबल वॉर्मिंग’ चिंताजनक आहे. पूर, दुष्काळ इत्यादी विविध नैसर्गिक आपत्तींचे तसेच समुद्राच्या पातळीत वाढ, हिमनद्या वितळणे यासारख्या पर्यावरणीय धोक्यांचेही ते मूळ कारण आहे. मिथेन वायू हादेखील ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला कारणीभूत आहे. तो हरितगृह वायू असून कार्बन डाय ऑक्साईडपेक्षा 20 पटीने जास्त प्रभावी आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, जंगलतोड, अत्याधुनिक मानवी जीवनशैली आणि प्रवृत्तींमुळे कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड इत्यादीसारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे. या वायूंमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात मोठी वाढ होत आहे; जे खूप चिंताजनक आहे.

खाण प्रक्रियेदरम्यान पृथ्वीच्या खाली असलेला मिथेन वायू बाहेर पडतो. गुरे पाळण्यामुळेही खतातून मिथेन बाहेर पडते. माणूस कागद तयार करण्यासाठी, घरे बांधण्यासाठी झाडे तोडत आहे. झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषू शकतात आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे अशा वायूंचे प्रमाण आपसूकच वाढते. Global warming ‘ग्लोबल वॉर्मिंग’ असेच चालू राहिल्यास भविष्यात घातक परिणाम जाणवणार आहेत. त्यात ध्रुवीय बर्फाच्या टोप्या वितळणेही आलेच. ज्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होणार आणि समुद्रकिनारा वाढणार. खंड हळूहळू बुडत जाणार.

अशावेळी ऊर्जा स्त्रोतांचा अपव्यय कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल आणि वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाणही कमी होईल. Global warming ‘ग्लोबल वॉर्मिंग’ कमी करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पुनर्वापर होय. त्याने प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कागद किंवा काचेचा पुनर्वापर होणार आणि त्या कचर्‍याचे उघड जाळणे कमी होईल. ही प्रक्रिया कार्बन डाय ऑक्साईड आणि विषारी पदार्थ सोडण्यात योगदानच देते. याशिवाय जंगलतोड कमी करून अधिकाधिक झाडे लावायला हवीत. जर आपण सर्वांनी मिळून आजच ही पावले उचलली, तर आणि तरच उद्या आपले भविष्य उज्ज्वल असेल, अन्यथा कठीण आहे.

– 9881717832