नवी दिल्ली : जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? असा प्रश्न विचारला की, चीन…हे उत्तर असायचे. त्यापाठोपाठ दुसर्या क्रमांकावर भारताचे नाव येत असे. मात्र आता भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही जास्त झाली असून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा २.९ दशलक्षांनी जास्त झाली आहे.
युएनएफपीएने ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, २०२३’ रिपोर्ट प्रकाशित केला आहे. याचे शीर्षक ८ बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस असे आहे. हा रिपोर्ट युएनने आजच जाहीर केला आहे. अहवालातील ताजी आकडेवारी ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या १,४२८.६ दशलक्ष आहे तर चीनची १,४२५.७ दशलक्ष आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर होती, परंतू ती यंदा कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे भारताची लोकसंख्या वाढत चालली आहे. असे असले तरी १९८० पेक्षा वाढीचा वेग कमी आहे. म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर पूर्वीपेक्षा कमी आहे. हाच एवढा दिलासा आहे.
भारत हा युवांचा देश म्हटला जात आहे. ० ते १४ वर्षे वयोगटाचा एकूण लोकसंख्येतील वाटा २५ टक्के आहे. १० ते १९ वयोगटातील १८ टक्के, १० ते २४ वयोगटातील लोकांची संख्या २६ टक्के आहे. १५ ते ६४ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या ६८ टक्के आहे. तर ६५ वर्षे वयावरील लोकांचा लोकसंख्येतील वाटा हा ७ टक्के आहे. याउलट चीनचे आहे. चीनमध्ये ६५ वर्षे वयावरील लोकांचा लोकसंख्येतील वाटा हा १४ टक्के आहे. ० ते १४ वर्षे वयोगटाचा १७%, १० ते १९ वयोगटाचा १२% , १० ते २४ वर्षे वयोगटाचा १८%, १५ ते ६४ वर्षे वयोगटाचा ६९% वाटा आहे.