नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग आठ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार आहे, जो गुणतालिकेत 4थ्या क्रमांकावर असणाऱ्या संघासोबत खेळवला जाईल. हा सामना 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल.
सध्या न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चौथ्या क्रमांकासाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत न्यूझीलंड संघ चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यानंतर पाकिस्तानचा दावा आहे. दोघांचे 8 सामन्यांत समान 8 गुण आहेत. पण नेट रन रेटमध्ये किवी संघ खूप पुढे आहे. न्यूझीलंडला 9 नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे.
न्यूझीलंडने हा सामना गमावल्यास पाकिस्तानच्या अपेक्षा वाढतील. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्ध 11 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शेवटचा गट सामना खेळायचा आहे. बंगळुरूमध्येही पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर न्यूझीलंड-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोघांचे १-१ गुण समान होतील. तरीही पाकिस्तानचा फायदा होईल.
न्यूझीलंडचा पराभव झाल्यास किंवा पावसामुळे सामना रद्द झाल्यास पाकिस्तानी संघाला इंग्लंडला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल. मात्र येथेही मोठी अडचण समोर उभी आहे. ती अडचण दुसरी कोणी नसून अफगाणिस्तान संघाची आहे. वास्तविक, सध्या नंबर-4 च्या दावेदारांमध्ये फक्त 3 संघ आहेत, त्यापैकी तिसरा संघ अफगाणिस्तान आहे.
अफगाणिस्तान संघाचे सध्या 8 गुण असून त्यांचे 2 साखळी सामने बाकी आहेत. अफगाणिस्तानला हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहेत. जर अफगाणिस्तानने हे दोन्ही सामने जिंकले, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोघांनीही जिंकले तरी ते त्यांना मागे टाकून नंबर-4 गाठतील आणि उपांत्य फेरीत प्रवेश करतील.