India Pakistan ceasefire: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. या दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताकडून पाकिस्तनात एअर स्ट्राईक करण्यात आली होती. ही एअर स्ट्राईक दशतवाद्यांविरुद्ध होती मात्र, पाकिस्तानने हे ऍक्ट ऑफ वार असल्याचा थयथयाट करत भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष दोन – तीन दिवसांपासून तीव्र झाला होता. यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. अश्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की भारत आणि पाकिस्तान अखेर युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याबाबत माहिती दिली आहे.
“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडेलवर लिहले आहे की, रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत.
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा संबंध असल्याचे उघड झाले होते. या संदर्भात भारताने बुधवारी पाकिस्तान आणि बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतीय लष्करी आणि नागरी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हाणून पाडला. बुधवारपासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत, ज्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.