भारतानं केलं पाकिस्तानचं समर्थन, वाचा काय घडलं संयुक्त राष्ट्रांमध्ये

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहमीच जोरदार खडाजंगी होत असते. मात्र नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तानने मांडलेल्या एका प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला आहे. भारताच्या या निर्णयामुळे अनेक देशांच्या भुवया उंचवल्या असल्यातरी अनेक देशांनी भारताच्या भुमिकेचे जोरदार स्वागत केले आहे. संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार परिषदेमध्ये कुराण जाळण्याविरोधात पाकिस्तानने दाखल केलेल्या निषेध प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये धार्मिक द्वेषाशी संबंधित प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून जगभरातील सरकारांना धार्मिक द्वेष रोखण्यासाठी कठोरातील कठोर पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने सांगितले की, ५७ इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीकडून पाकिस्तान आणि पॅलेस्टाईन यांनी आणलेल्या या प्रस्तावाला २८-१२ असा पाठिंबा मिळाला. तर ७ देश मतदानाला गैरहजर राहिले. १२ देशांनी या प्रस्तावाला विरोध केला.

विरोध करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, रोमानिया, लिथुआनिया, कोस्टा रिका आणि फिनलँड यांचा समावेश आहे. तर भारत आणि चीन या बड्या देशांसह एकूण २८ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. मतदानावेळी अनुपस्थित राहणाऱ्या देशांमध्ये नेपाळचा समावेश होता.

प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या देशांनी सांगितले की, फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली अशा घटनांना प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही. हा प्रस्ताव गेल्या महिन्यात स्वीडिश अधिकाऱ्यांनी एका इराकी व्यक्तीला स्टॉकहोम मशिदीसमोर कुराण जाळण्याची परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आला होता.