India vs China Hockey Final : जेतेपदासाठी अवघ्या काही तासात चीनशी भिडणार ‘भारत’

India vs China Hockey Final : एशियन चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने सहाव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा एन्ट्री मारली आहे. यावेळी भारताचा सामना यजमानपद भूषविणाऱ्या चीनशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींची नजर आहे.

साखळी फेरीत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाच पैकी पाच सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. तसेच उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभवाचं पाणी पाजलं. दुसरीकडे, चीनने पाकिस्तानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये धुव्वा उडवला आहे.

चीन आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत सुटला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाल गेला. चीनने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली. चीनचा संघ अंतिम फेरीत पहिल्यांदाच खेळत आहे. तर चीनने आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताने साखळी फेरीत चीनचा 3-0 ने पराभव केला होता. भारताने एकही सामना न गमवता अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

कुठे पाहता येईल सामना ?
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम सामना रंगणार आहे. चीनच्या हुलुनबुइर येथे हा सामना होत असून, दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लाइव्ह ॲप आणि वेबसाइटवर होईल.