---Advertisement---
नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. ओली सरकारविरुद्ध तरुण घॊषणाबाजी करून आंदोलन करीत आहेत. तसेच, या आंदोलनात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, मंगळवारी भारताने नेपाळमधील परिस्थितीबाबत मार्गदर्शकतत्त्व जारी केले आहते. सोशल मीडियावरील बंदीवरून सुरु झालेल्या हिंसक संघर्षांनंतर, भारताने नेपाळमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनाद्वारे सर्व भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यासोबत नेपाळ प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांबद्दल भारताकडून दुःख व्यक्त करीत पीडित कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नेपाळ येथील होणाऱ्या घडामोडीवर आम्ही सोमवारपासून लक्ष ठेवून आहोत. या आंदोलनात अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याने दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबांसोबत भारताच्या संवेदना आहेत. या हिंसक आंदोलनात जखमी झालेल्या सर्व तरुण लवकर बरे होतील अशी इच्छा व्यक्त केली आहे. जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, आम्ही सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगावा आणि शांतता आणि संवादाद्वारे कोणतीही समस्या सोडवावी अशी अपेक्षा करतो. तसेच, परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व पक्षांनी नेपाळमधील सध्याची परिस्थिती संवादाद्वारे सोडवावी.
तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, काठमांडू आणि नेपाळच्या इतर अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे हे देखील आम्ही पाहिले आहे. नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याची आणि नेपाळ प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती केली आहे.
सोमवारी, नेपाळमधील २६ सोशल मीडिया साइट्सवरील बंदीमुळे संतप्त झालेल्या १८ ते ३० वयोगटातील तरुणांनी सरकारविरुद्ध निषेध सुरू केला. परिस्थिती इतकी बिकट झाली की संचारबंदी लागू करावी लागली. आतापर्यंत २१ हून अधिक निदर्शकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २५६ लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.