ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा केली आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे आणि यशस्वी जयस्वालला अंतिम संघात न मिळालेल्या स्थानामुळे या निवडीने क्रिकेटप्रेमींमध्ये आश्चर्य निर्माण केले आहे.
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या फिटनेसबाबत अनिश्चितता होती. मात्र, तो वेळेत तंदुरुस्त होईल या आशेवर निवड समितीने त्याचा संघात समावेश केला होता. मात्र, बीसीसीआयने 11 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे जाहीर केले की बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. त्याच्या जागी नवख्या हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.
यशस्वी जयस्वाल ऐवजी वरुण चक्रवर्तीचा समावेश
संघाच्या निवडीत आणखी एक मोठा बदल म्हणजे यशस्वी जयस्वालला मुख्य संघातून वगळण्यात आले आहे. तो ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह खेळाडू म्हणून संघासोबत असेल. यशस्वीच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचा समावेश करण्यात आला आहे. यशस्वीला सलामीवीर म्हणून पर्यायी खेळाडू म्हणून पाहिले जात होते, मात्र त्याच्या जागी चक्क स्पिनर वरुणला संधी देण्यात आली आहे.
वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन करत पाच सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कामगिरीच्या जोरावर त्याला एकदिवसीय संघातही संधी देण्यात आली होती. आता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम संघात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा :कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
- रोहित शर्मा (कर्णधार)
- शुभमन गिल (उपकर्णधार)
- विराट कोहली
- श्रेयस अय्यर
- केएल राहुल (विकेटकीपर)
- ऋषभ पंत (विकेटकीपर)
- हार्दिक पंड्या
- अक्षर पटेल
- वॉशिंग्टन सुंदर
- कुलदीप यादव
- मोहम्मद शमी
- अर्शदीप सिंग
- रवींद्र जडेजा
- वरुण चक्रवर्ती
- हर्षित राणा
दरम्यान, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारतीय गोलंदाजीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी हर्षित राणाला निवडणे हा धाडसी निर्णय मानला जात आहे. तसेच, यशस्वी जयस्वालला अंतिम संघात स्थान न मिळाल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, वरुण चक्रवर्तीच्या अलीकडील कामगिरीवर विचार करता, निवड समितीचा हा निर्णय भारतीय फिरकी आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या बदलांमुळे टीम इंडियाचा खेळ कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.