भारतीय संस्कृती व संस्कारांचे प्रतीक श्रीराम

इतस्ततः

– शरद पदमावार

माणसाने अनंतकाळ सुखाचा अहर्निश शोध घेतला आहे. या शोध प्रवासात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं आणि आपल्या मनाप्रमाणे सर्व घडलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधी कळली नसती. आपल्या संस्कृतीने मर्यादांची जाणीव आणि प्रार्थनेचे महत्त्व यांची शिकवण कायम दिली आहे. भारतीय संस्कृती आणि संस्कारांच्या श्रेष्ठत्वाचा महोत्सव म्हणजे रामजन्माचा सोहळा होय.

1. अथांग अर्थाचा राम

‘राम’ (Shri Ram) या शब्दातच अथांग अर्थ भरलेला आहे. आपल्या प्रत्येकात रामाचा अंश असतो, म्हणून पर्यायाने राम सर्वव्यापी आहे. राम हे निव्वळ व्यक्तीचे नाव नाही. त्याचा खरा अर्थ ‘रमयति सर्व:’- म्हणजे जो सर्वांना सुखी करतो असा आहे. भेट आणि निरोप दोन्ही ‘राम-राम’ या शब्दाने होतात. अभीष्टचिंतन आणि सुखकामना दोन्ही त्यात अंतर्भूत आहेत. दिवसाची सुरुवात रामप्रहराने होते. जीवनाच्या शेवटी ‘राम नाम सत्य है’ हा उद्घोष असतो. जीव रमत नसेल तर काही ‘राम’ राहिला नाही असे आपण म्हणतो. रामरक्षेचे नित्यपठण पिढ्यान्पिढ्या होत आले आहे. भीतीवर नियंत्रण आणि मनाचे सुरक्षाकवच यासाठी रामरक्षा हा रामबाण मंत्र समजला जातो.

2. रामचरित्राचा स्रोेत

रामाचे (Shri Ram) चरित्र पिढ्यान्पिढ्या अखंड परंपरेचे अविनाशी स्रोत राहिले आहे. बहुभाषेतील अगणित साहित्याने अवघ्या जनमानसाला राम, रामायण आणि रामराज्य यांच्या माध्यमातून वेढलेले आहे. थोरांनी रामकथेच्या पलीकडील अर्थ ओळखणे अगत्याचे असते. राम शूर राजा होता ही रामाची पूर्णतः अपूर्ण ओळख ठरेल. मर्यादापुरुषोत्तम राम ही त्याची प्रतिमा रामायणाच्या प्रवासात वारंवार अधोरेखित होते. रामाने सत्याची साथ कदापि सोडली नाही. राम सत्यवचनी, दृढनिश्चयी होता. रामवाणी म्हणजे एकवाणी. प्रत्येक शब्द तंतोतंत पाळणार. मागून तो बदलणे नाही, फिरविणेही नाही. राम म्हणजे एकबाणी. लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणारा ही रामाची ‘याती होती. सर्वांशी सद्वर्तन हा रामाचा धर्म. सूर्याची तप्त किरणे चंद्र स्वीकारतो आणि फक्त शीतल, आल्हाददायक किरणेच आपल्याला देतो. म्हणून इतरांना कायम आल्हाद देणार्‍या रामाला ‘रामचंद्र’ हे संबोधन आहे. ‘रमयति सर्व:’

3. रामाचा जीवनपट

रामाच्या जीवनपटाचे चार प्रमुख टप्पे आहेत. पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानणारा (Shri Ram) ‘दाशरथी राम’, गृहस्थाश्रमाची जबाबदारी सांभाळणारा ‘सीताराम’, राजा या नात्याने समाजाच्या बांधिलकीचे वहन करणारा ‘राजाराम’ आणि स्वव्यक्तित्वाची उन्नती करणारा ‘आत्माराम’ हे ते चार टप्पे होत. रामाची भूमिका प्रत्येक टप्प्यात आणि कालखंडात समयोचित आणि सत्यपूर्ण राहिली आहे.

‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’ हे सूत्र (Shri Ram) रामाने मनापासून स्वीकारले. मंथरेचे कुटिल कारस्थान, कैकयीचा स्वार्थ वा पित्याचा कठोर आदेश यात रामाने कोणाचाही द्वेष केला नाही वा क्रोधही प्रकट केला नाही. रामायणातील राम-रावण युद्ध हा सत्य आणि असत्य यामधील निर्णायक संघर्ष आहे. भक्तीचा अहंकार आणि अमर्याद लालसा यांनी प्रेरित झालेल्या रावणाच्या दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन ही त्याची परिणिती. म्हणून असत्याचा बीमोड करण्याचा विजयोत्सव म्हणून विजयादशमीचे औचित्य आहे.

4. रामायणाची सामाजिक व्यापकता

महर्षी वाल्मीकिंच्या श्लोकांपासून आधुनिक वाल्मीकिंच्या (ग. दि. माडगूळकर) ‘गीत रामायणा’पर्यंत रामायण महाकाव्य विविध स्वरूपात प्रकट होत राहिले. (Shri Ram) तुलसी रचित रामगाथा, एकनाथी रामायण, रामरक्षा, कबीराचे दोहे अशा अगणित रचनांमधून आणि कथा, भक्तिगीत, कीर्तन, अभंग, भजन अशा अनेकविध माध्यमांतून असंख्य संतांनी आणि साहित्यिकांनी रामायणाची महती जनमानसापुढे उलगडली. वैशिष्ट्य असे की, अवघ्या जनसामान्यांनी रामायणाचा प्रत्येक साहित्यिकी आविष्कार अतीव प्रेमाने आपलासा केला. कलाकृतीचा कोणताही विषय काळजाला भिडणारा आणि मनाला भावणारा असला की, त्याची प्रचंड ओढ निर्माण होते. ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ ही साधी सरळ प्रार्थना असो किंवा ‘मन रामरंगी रंगले’ हा रसाळ, अवीट गोडीचा अभंग असो, चित्त रमणीय करण्याची त्यांची प्रतिभा ‘राम’ या एका शब्दाने अमृततुल्य केली आहे. अवघ्या भारताला गांधीजींचे ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन परिचित आहे. ‘श्रीराम-जय-राम-जय-जय-राम’ हा 13 अक्षरांचा रामदासी महामंत्र त्याच्या महाशक्तीसाठी ओळखला जातो.

5. रामनामाचे चिरंजीवित्व

पिढ्यान्पिढ्या भारतीयांच्या मनातील गाभार्‍यात (Shri Ram) रामायण अनभिषिक्तपणे विराजमान आहे. रामनामाने माणसाच्या आयुष्यात वृद्धिंगत करणारा सकारात्मक परिणाम होतो, ही एक विलक्षण व अद्भुत अनुभूती आहे. सद्गुण, सद्विचार आणि सदाचार हे रामतत्त्वाचे त्रिसूत्र रामचरित्रात जागोजागी ठसठशीतपणे जाणवते. ज्ञान, विचार आणि शिकवण यांनी रामायणाला चिरंजीवित्व बहाल केले आहे. आपल्या संस्कृतीचा मानबिंदू म्हणून रामायणाचे महत्त्व कदापिही लयाला जाणार नाही. उलटपक्षी ‘राम’ या शब्दाचे महत्त्व काळाच्या ओघात चढेच राहिले आहे. आपण तो किती समजून घेतो आणि त्या अनुरूप किती आचरण करतो, हे महत्त्वाचे.

‘रामाचा’ महिमा अटळ, अढळ, अविनाशी आणि अनंतकालीन आहे. हे चिरंतन आणि त्रिकालाबाधित सत्य ज्याला उमगले त्याने राम अंतर्यामी जाणावा, भजावा, उच्चारावा आणि आचरावा. (Shri Ram) आयुष्यात सुख-समाधान (म्हणजेच राम) हवे असेल तर ‘रामाची’ कास धरणे क‘मप्राप्त आहे. ‘रामाची’ महती जाणून घेण्याचा हा छोटेखानी प्रयत्न… रामराम…!

– 98197 94299