नवी दिल्ली : भारतीयांचा काळा पैसा ठेवण्याची सर्वात विश्वासाहार्य जागा म्हणजे स्विस बँक मानली जाते. स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा हा भारताच्या राजकारणातील सर्वात प्रमुख मुद्द्यांपैकी एक मानला जातो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, काळ्या पैशांचा मुद्दा प्रचंड गाजला होता. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या पैशात मोठी घट झाली आहे. काळा पैसा कमी होण्याशीही त्याचा संबंध जोडला जात आहे. ही माहिती सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंडने (स्वित्झर्लंड नॅशनल बँक) जारी केली आहे.
सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंडच्या वार्षिक आकडेवारीनुसार, स्विस बँकांमध्ये भारतीय ग्राहकांच्या एकूण ठेवींमध्ये पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या १४ वर्षांतील हा उच्चांक आहे. घटती आकडेवारी काळ्या पैशावर नियंत्रण असल्याचे संकेत देत असल्याचे मानले जात आहे. तथापि, या आकडेवारीत भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतर लोकांच्या पैशांचा समावेश नाही.
देशातील विद्यमान मोदी सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे काळ्या पैशाशी संबंधित कारवायांना आळा बसल्याचे मानले जात आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी तसेच करचोरी शोधण्यासाठी सरकारने अनेक आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षर्या केल्या आहेत. या प्रयत्नांमुळे स्विस बँकांमध्ये जमा होणार्या पैशात घट झाली आहे.
२०२१ मध्ये भारत सरकारने स्विस सरकारकडे भारतीय बँक ग्राहक आणि संस्थांचे तपशील मागितले होते. त्यानंतर स्विस बँकेच्या ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरिया, स्वीडन, अर्जेंटिना, बहारीन, ओमान, न्यूझीलंड, मॉरिशस आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.