भारतीय वैद्यकीय सेवेला जगात प्रतिष्ठा !

 

वेध

– गिरीश शेरेकर

गेल्या ९ वर्षांत भारतीय वैद्यकीय सेवेला सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. कोरोना काळात तर प्राधान्याने वैद्यकीय क्षेत्राकडे लक्ष देण्यात आले. या प्रामाणिक प्रयत्नांचे आता सुखद परिणाम दिसायला लागले आहेत. गेल्या वर्षी १४ लाख परदेशी पर्यटक केवळ वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आले. यावरून भारत वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र म्हणून प्रस्थापित होत असल्याचे सिद्ध होते. ही मोठी उपलब्धी आहे. एक काळ असा होता की, भारतातले आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक विदेशात जाऊनच उपचार घ्यायचे. त्या स्थितीत आता आश्वासक बदल झाला आहे. स्थानिक वैद्यकीय सुविधांमधूनच उपचार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. अगदी पर्यायच नसेल तर विदेशात जाण्याचा निर्णय घेतला जातो. याचाच अर्थ वैद्यकीय सुविधांबाबतचा विश्वास जसा भारतात वाढला आहे तसाच तो जगातही वाढत असल्यानेच विदेशातून मोठ्या संख्येने रुग्ण भारतात येत आहेत.

भविष्यात हे क्षेत्र आणखी विस्तारेल इतक्या उपाययोजना सध्या हाती घेण्यात आल्या आहेत. विदेशातून उपचारासाठी येणा-या व्यक्तीसोबत त्यांचे नातेवाईकही येत असल्याने वैद्यकीय पर्यटनाबरोबरच कृषी व अन्य पर्यटनालाही चालना मिळत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. भारतात उपचारासाठी येण्याचे फायदे विदेशातून येणा-या व्यक्तींना होत आहे. त्यांना अत्यंत कमी खर्च येतो, उत्तम वैद्यकीय तंत्रे आणि उपकरणांची उपलब्धता योग्य असल्यामुळे परदेशी रुग्णांचा कल वाढतो आहे. विशेष म्हणजे इथल्या भाषेच्या समस्येचा त्यांना फारसा सामना करावा लागत नाही. कारण इंग्रजी बोलणारे भारतात सर्वत्र आढळतातत्यामुळे परदेशातील रुग्णांसाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण होत आहे. जेव्हा एखादा विदेशी रुग्ण भारतात येतो तेव्हा त्याच्यासोबत दोन-तीन सहकारीही रुग्णाची काळजी घेण्यासाठी येतात. ते अनेक महिने हॉटेलमध्ये राहतात. त्यातून आणि उपचारातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलनही मिळते.विद्यमान स्थितीत नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल फुफ्फुसात झालेल्या संसर्गावर उपचार घेण्यासाठी दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल आहेत. एका देशाचा राष्ट्रपती उपचारासाठी भारतात येत असेल तर भारतीय वैद्यकीय सेवेची विश्वसनीयता किती वाढली आहे, याची शाश्वती होते.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, नागपूरसह अन्य काही शहरे मोठ्या वैद्यकीय उपचारासाठी देशासह जगात प्रसिद्ध होत आहे. या क्षेत्रात काम करणा-या डॉक्टर, संशोधकांचे हे मोठे यश आहे. साहजिकच या यशात शासकीय व्यवस्थेचाही वाटा आहेच. भारतात येणारे बहुतेक परदेशी रुग्ण हृदयविकार, अस्थिरोग, किडनी, यकृत प्रत्यारोपण, नेत्रविकार आणि जळलेल्या जखमांवर उपचारासाठी येतात. त्यात आता जगभरात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांचीही भर पडली आहे. भारतात उच्च पात्रता धारण करणारे वैद्यकीय व्यावसायिक आणि अत्याधुनिक उपकरणे आहेत. आरोग्य सेवांच्या गुणवत्तेशी तडजोड नाही आणि खर्चही अमेरिका व इंग्लंडच्या तुलनेत फारच कमी येतो.त्यामुळे युरोप व अन्य आशियाई देशातील रुग्णदेखील भारतात मोठ्या संख्येने यायला लागले आहे. यशस्वी उपचाराची हमी मिळत असल्यानेच हा बदल झाला आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून भारताची जगभरात प्रतिष्ठा वाढली आहे, हे अनेक घटनांवरून वेळोवेळी समोर आले आहे.त्याच पद्धतीने ती वैद्यकीय क्षेत्रातही वाढली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणा-या व या सेवेशी जुळलेल्यांसाठी हा शुभसंकेत आहे.

वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थांचा कल वाढतो आहे, हे लक्षात घेऊन सरकार वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या देशभरात वाढत आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. याशिवाय परिचारिका, परिचर, तंत्रज्ञ व अन्य कुशल मनुष्यबळाला रोजगाराच्या चांगल्या संधी झालेल्या बदलातून मिळणार आहे. केंद्र सरकारचे वैद्यकीय क्षेत्राकडे काळजीपूर्वक लक्ष आहे. एम्सची संख्या वाढविण्यात येत आहे. पंतप्रधान आयुष्यमान भारतसारख्या योजनाही सुरू करण्यात आल्या आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील सरकारे उत्तम रुग्णालयांच्या उभारणीसह माफक दरात उपचार होतील, अशा योजना नागरिकांसाठी राबवित आहे. खाजगी वैद्यकीय सेवेलाही प्रोत्साहन दिले जात आहे. तेथेही योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळेच अत्याधुनिक रुग्णालये देशाच्या कानाकोप-यात उभी होताना दिसत आहे. या सर्व व्यवस्थांचा लाभ देशातल्या नागरिकांसोबतच विदेशातून येणा-या नागरिकांनाही मिळत आहे. विश्वसनीयतेचे वातावरण तयार झाले आहे.

९४२०७२१२२५