भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अरबी समु्द्रात माल्टा देशाचे जहाज MV रुएनचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समोर येताच भारतीय नौदलाने तातडीने बचाव कार्यासाठी धाव घेतली आहे. भारतीय नौदलाने आपली एक युद्धनौका आणि समुद्रात गस्त घालणाऱ्या विमानाला रवाना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माल्टाचे हे जहाज कोरियाहून तुर्कियेला जात होते. यावेळी सोमालियातील समुद्री चाच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीय नौदलाची विमाने या जहाजाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आता हे जहाज सोमालियाच्या किनाऱ्याकडे सरकत असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तासार, या प्रकरणी भारतीय नौदलाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अरबी समुद्रात घडलेल्या एका घटनेवर आम्ही तातडीने प्रत्युत्तर दिल्याचे नौदलाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे माल्टाहून आलेले जहाज होते. या जहाजात 18 जण उपस्थित होते. समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते, असे वृत्त आहेत. एडनच्या खाडीत गस्तीवर असलेल्या पथकाला माल्टा देशाचे जहाज MV रुएनकडून अपहरण झाल्याचा संदेश मिळाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर बचाव कार्यासाठी तात्काळ मदत पाठवण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली. भारतीय नौदलाने शुक्रवारी घटनास्थळी आपली मदत रवाना केली. नौदलाने सांगितले की, भारतीय नौदलाच्या विमानाने त्या जहाजाच्या वरून गस्त घातली आहे. त्याशिवाय, जहाजाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय नौदलाने एमव्ही रुएनचा शोध घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एडनच्या आखातातील चाचेगिरी विरोधी गस्तीवर या भागात पाळत ठेवण्यासाठी आपले नौदल सागरी गस्ती विमान पाठवले आहे.