T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. पण या आधीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. हवामान खात्यानुसार, आज ग्रॉस आयलेटमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सेंट लुसियाच्या वेळेनुसार सकाळी 7 ते 9 या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर सामना वेळेवर सुरू होणं कठीण आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. ग्रॉस आयलेटमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. त्यामळे आज सकाळी पाऊस झाला नाही तरी ते मैदान सामना खेळण्यासाठी योग्य असेल का, हाही एक मोठा प्रश्न आहे.
सामना रद्द झाला तर
पावसामुळे सामना रद्द करण्यात आला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात येईल. त्यानंतर भारतीय संघाचे एकूण 5 गुण होतील. पण ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी यामुळे वाढेल. कारण या सामन्यात विजय मिळाला तर त्यांना २ गुण मिळतील पण सामना रद्द झाल्यास त्यांना अवघा १ गुण मिळेल. अशा परिस्थितीत पुढच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवले तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील आणि ऑस्ट्रेलिया थेट स्पर्धेबाहेर फेकली जाईल. त्यामुळे आता आज पाऊस पडतो की भारतीय संघ वि ऑस्ट्रेलियाची लढत पहाला मिळते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.