Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तराची कारवाई सुरु केली आहे. खोऱ्यातील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली जात असून, सीमेपलीकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्नही हाणून पाडले जात आहेत. तसेच खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारले जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जलदगतीने ही कारवाई करत आहे. आज शुक्रवारी सकाळी लष्कराने लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. दरम्यान, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी केले असून, सिंधू जल करार स्थगित केला आणि पाकिस्तानी व्हिसाही रद्द केला आहे. त्यामुळे आता मोदी सरकार लवकरच मोठी पावले उचलण्याची शक्यता असून, एक-दोन दिवसांतचं पाकिस्तानला त्यांच्या कृतींचे योग्य उत्तर दिले जाईल, असे म्हटले जात आहे.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सतत शोध मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, मोंघामा त्राल येथील दहशतवादी आसिफ शेखच्या घरात सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाली दिसून आल्यावर लष्कराने ते घर स्फोटांनी उद्ध्वस्त केले. आसिफ पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचे म्हटले जात असून, सरकारने आसिफवर २० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
आसिफचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर, लष्कराने दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा भागात लष्कर-ए-तैयबाचा आणखी एक दहशतवादी आदिल ठोकर याचे घरही उद्ध्वस्त केले. पहलगामच्या बैसरन येथील दहशतवादी घटनेत आदिलचा सहभाग असल्याचा संशय आहे.
नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले
दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याव्यतिरिक्त, नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सैन्यदेखील सतर्क आहे. भारताच्या कठोर निर्णयामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. यावेळी नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यात अनेक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त झाल्या. प्रत्युत्तराच्या कारवाईने पाकिस्तानचा भारतात घुसखोरीचा प्रयत्नही हाणून पाडण्यात आला.
बारामुल्लानंतर बांदीपोरामध्येही मारले गेले दहशतवादी
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी बांदीपोरा जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपोरा परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आणि परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू केली.
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा कर्मचारीही जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, काही वेळातच सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख अल्ताफ अशी झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर बारामुल्लामध्येही दोन दहशतवादी मारले गेले.
दरम्यान, बुधवारी, बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या २४ तासांत हे दोन्ही दहशतवादी मारले गेले. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील उरी नाला येथेही लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता.