तरुण भारत लाईव्ह न्युज : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने रविवारी एकाच वेळी ब्रिटनचे 58.5 किलोचे तब्बल 36 उपग्रह प्रक्षेपित करून इतिहास घडविला आहे. एलव्हीएम3-एम-3/वनवेब इंडिया-2’ या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम संपूर्णपणे यशस्वी झाल्याने इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इस्रोची ही कामगिरी अभूतपूर्व अशीच आहे. या प्रक्षेपणामुळे व्यावसायिक Satellite उपग्रह प्रक्षेपणात इस्रोने आपले स्थान अधिकच बळकट केले आहे. या अफाट आणि देदीप्यमान कामगिरीबद्दल इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यासह अन्य वैज्ञानिक, संशोधक, शास्त्रज्ञ, अभियंता व तंत्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत. या शास्त्रज्ञांचे अखंड परिश्रम, सातत्य, चिकाटी, आत्मविश्वास आणि मुख्य म्हणजे या सर्वांना केंद्रातील मोदी सरकारकडून मिळत असलेले सततचे प्रोत्साहन व पाठबळ याचाच हा परिपाक आहे. सर्वात महत्त्वाची आणि भारताच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी याच रॉकेटचा वापर होणार आहे. या मोहिमेत इस्रोचे 43.5 मीटर लांबीचे एलव्हीएम-3 रॉकेट वापरले गेले. हे इस्रोचे सर्वांत वजनदार रॉकेट आहे. रविवारच्या या यशस्वी प्रक्षेपणामुळे जगाच्या कानाकोपर्यात अंतराळ आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरविण्याच्या योजनेत मदत होणार आहे. तसेच वनवेबमुळे केवळ भारतातील उद्योगांनाच नव्हे तर शहरे, गावे, महानगर पालिका आणि शाळांनाही कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे.
वनवेब इंडिया-2 या यशस्वी मोहिमेच्या पृष्ठभूमीवर एकूणच भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील स्थान आणि या क्षेत्रातील कामगिरी याचेही विश्लेषण झाले पाहिजे व भविष्याच्या दृष्टीने भारत कोणती पावले उचलणार आहे, याचाही आढावा घेतला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 75 वर्षांत देशाला मोठे करण्यात अनेकांनी आपले योगदान दिले आहे. भारत आज अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश संशोधन या क्षेत्रातही भारताची घोडदौड सुरू आहे. आधुनिक जगात विज्ञानाच्या वाढत्या प्रभावादरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने आपल्या Satellite कामगिरीने भारताला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख दिली आहे. जिथे पूर्वी भारत आपल्या उपग्रहासाठी इतर देशांवर अवलंबून होता, तिथे आता इतर देश आपले उपग्रह पृथ्वीच्या बाहेर पाठवण्यासाठी इस्रोची मदत घेत आहेत. जेव्हा उपग्रहांच्या उपयोगाविषयी अमेरिकेसारख्या देशात प्रायोगिक रूपात माहिती होती, त्या 1960 च्या सुरुवातीच्या दशकापासून आपल्या देशात अंतराळ संशोधन उपक्रम सुरू झाले. अमेरिकन उपग्रह ‘सिंकॉम-3’ द्वारे प्रशांत महासागर ओलांडून टोकियो ऑलिम्पिकच्या थेट प्रक्षेपणाने उपग्रहांचे सामर्थ्य भारतासाठी किती महत्त्वाचे आहे, हे भारतीय अवकाश कार्यक्रमाचे संस्थापक व जनक डॉ. विक्रम साराभाई यांनी त्वरित ओळखले. अंतराळ संशोधनामुळे दळणवळण, शिक्षण या क्षेत्रात क्रांती होऊन मनुष्य आणि समाजाच्या वास्तविक समस्या सुटण्यास मदत होईल, हे डॉ. विक्रम साराभाईंना मनापासून पटले होते. म्हणूनच अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक म्हणून डॉ. साराभाई यांनी भारतीय अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून सक्षम आणि बुद्धिमान वैज्ञानिक, मानववंशशास्त्रज्ञ, संप्रेषक आणि सामाजिक शास्त्रज्ञांचा एक गट तयार केला. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून आज भारत विक्रम साराभाई यांना ओळखतो. त्यांच्याच दूरदृष्टीने 1969 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना झाली. त्यांनी बनवलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव ‘आर्यभट्ट’ होते; जो 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियन (रशिया) च्या मदतीने पृथ्वीवरून सोडण्यात आला होता. 2000 चे दशक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. जगामध्ये इतरत्र चंद्र आणि इतर जवळील ग्रह, धूमकेतू, लघुग्रह मोहिमा आखल्या जात होत्या. भारत विकसनशील देश असूनही त्याकाळी या स्पर्धेत उतरला. ‘कल्पना-1’ हा 12 सप्टेंबर रोजी ‘पीएसएलव्ही’चा वापर करून प्रक्षेपित केलेला पहिला हवामानविषयक समर्पित उपग्रह होता. मूळच्या भारतीय पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन झाल्यावर 2003 मध्ये याला ‘कल्पना’ हे नाव देण्यात आले.
20 सप्टेंबर 2004 रोजी ‘एज्युसॅट’ उपग्रह प्रक्षेपित केला. केवळ शिक्षणाला वाहिलेला हा पहिला भारतीय Satellite उपग्रह होता. यामुळे पूर्वी सकाळी आणि दुपारी दूरदर्शनवर खास ‘क्लासरूम’ आयोजित केल्या जात असत. 2005 मध्ये ‘कार्टोसॅट-1’ उपग्रह प्रक्षेपित झाला. ही बाहेरून पृथ्वीचे निरीक्षण करणारी मोहीम होती. तसेच, याच सोबत ‘हॅमसॅट’ हा अवघा 42 किलोंचा उपग्रह प्रक्षेपित झाला. हा उपग्रह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय हौशी रेडिओ ऑपरेटर्ससाठी सेवा देणारा होता. 2008 साल उजाडले ते एक नवी झेप घेण्यासाठी. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताचे चांद्रयान-1 हे स्वदेशी मानवरहित अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविण्यात आले. यापूर्वी जगातील केवळ सहा देश हे करू शकले होते. इस्रोची ही पहिलीच मोहीम होती, ज्याने शतकातील सर्वात मोठा शोध लावताना चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे जगाला सांगितले. चांद्रयान पीएसएलव्ही-सी 11 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आले. चांद्रयान-1 चंद्रावर जाण्यासाठी पाठविण्यात आले होते. चांद्रयान-1 ने सुमारे 11 महिने काम केले आणि चंद्राभोवती 3400 हून अधिक प्रदक्षिणा केल्या. चांद्रयान-1 च्या शोधाने त्यावेळी जगातील अनेक बलाढ्य देशांनाही आश्चर्यचकित केले होते. वर्ष 2014 मध्ये इस्रोने एका मेगा मिशनद्वारे एक नवीन जागतिक विक्रम केला होता. भारताने पीएसएव्ही अंतराळ यानाद्वारे 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. यापूर्वी हा विक्रम केवळ रशियाच्या नावावर होता, ज्याने एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित करून जागतिक विक्रमात आपले नाव नोंदवले होते. भारताच्या या प्रक्षेपणात 101 छोटे उपग्रह होते, ज्यांचे वजन 664 किलो होते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेची बस ज्या प्रकारे मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडते त्याच पद्धतीने ते अंतराळात सोडण्यात आले. जीएसएलव्ही मार्क-2 चे यशस्वी प्रक्षेपण ही इस्रोची एक मोठी उपलब्धी होती. कारण त्यात स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन बसवण्यात आले होते. या यशानंतर भारताला उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इतर देशांची मदत घ्यावी लागली नाही, भारत पूर्णपणे स्वावलंबी झाला.
भारताने अनेक लहान-मोठे उपग्रह अवकाशात पाठवले. परंतु, महत्त्वाचे ठरले ते 2014 मध्ये प्रक्षेपित केलेले Satellite ‘मंगळयान-1.’ ही मोहीम ‘मार्स ऑर्बिटर’ किंवा ‘मंगळयान’ या नावाने ओळखली जाते. ही मंगळ ग्रहावर जाणारी भारताची पहिली आंतरग्रह मोहीम होती. 24 सप्टेंबर 2014 रोजी ‘मंगळयाना’ने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत अंतराळयान पाठविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. शिवाय अत्यंत कमी खर्चामध्ये आणि संपूर्णपणे स्वदेशी मोहीम यशस्वी झाल्याने भारताच्या पुढील अंतराळ प्रवासाचा स्वतंत्र मार्ग खुला झाला. एवढेच नाही, तर इतर अनेक देश त्यांच्या प्रक्षेपणासाठी भारताकडे येऊ लागलेले होते, त्यांच्या संख्येतही वाढ झाली. आपले तंत्रज्ञान श्रेष्ठ आणि तुलनेने स्वस्त असल्याने सर्वांना फायदा होऊ लागला. 6 सप्टेंबर 2019 रोजी अजून एक महत्त्वाचे प्रक्षेपण झाले; ते म्हणजे ‘चांद्रयान-2’ या उपग्रहाचे. ही एक गुंतागुंतीची मोहीम होती. याचे ‘विक्रम’ लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जरी हवे तसे उतरले नसले, आपटले असले तरी ही मोहीमदेखील वाया गेली नाही. कारण यामधून आजही अत्यंत उपयुक्त माहिती मिळत आहे. पुढे 2026 पर्यंत त्याचे कार्य चालू राहील, अशी अपेक्षा आहे. परंतु, सर्व भारतीयांचे Satellite ‘आदित्य-एल-1’ आणि ‘गगनयान-1’ या तीन मोहिमांकडे लक्ष लागले आहे. आदित्य-एल-1 ही मोहीम सूर्याच्या अभ्यासासाठी आखण्यात आली आहे तर सर्वात महत्त्वाची गगनयान-1 मोहीम. ही भारताची पहिली मानवी मोहीम आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर भारत मानवी मोहिमांमध्येदेखील अग्रेसर देश असेल, यात शंका नाही. या सर्व मोहिमा 2023 ते 2024 कालावधीमध्ये प्रक्षेपित होतील, असा अंदाज आहे. भारतामध्ये प्रतिभेचे भांडार आहे आणि युवकांमध्ये प्रचंड महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती आणि भविष्यात पुढे जाण्याची भव्यदिव्य स्वप्ने आहेत. भारताचे राष्ट्रीय नेतृत्वदेखील या युवकांच्या पंखांना बळ देणारे आहे. म्हणूनच अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये आपण काही वर्षांमध्ये आपण गगनभरारी घेऊ, असा विश्वास वाटतो.