भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने इतिहास रचत टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार विक्रांत केणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात इंग्लंडला तब्बल 79 धावांनी पराभूत केलं आणि आपल्या दबदब्याचं प्रदर्शन करत ट्रॉफी जिंकली. हा विजय भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
अंतिम सामन्याचा थरार
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 197 धावांचा डोंगर उभा केला. फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडसमोर विजयासाठी 198 धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात, इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः चकवून 19.2 षटकांत 118 धावांवर गुंडाळलं.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
टीम इंडियाचा संघ
कर्णधार विक्रांत केणीने आपल्या नेतृत्व कौशल्याने संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासह रवींद्र संते (उपकर्णधार), योगेंदर भरोदिया, आकाश पाटील, राजेश कन्नूर, नरेंद्र मंगोरे, जितेंद्र व्हीएन, सन्नी गोयत, निखील मनहास, माजिद मरग्रे, आणि राधिका प्रसाद यांनीही अप्रतिम खेळ दाखवला.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
भारतीय संघाचा प्रवास
टीम इंडियाचा हा प्रवास कठीण असला तरी त्यांच्यातील जिद्द आणि एकजुटीच्या बळावर त्यांनी हा विजय साकारला. फलंदाजीत आणि गोलंदाजीत संघाने सातत्य राखत संपूर्ण स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम ठेवलं.
दिव्यांग असतानाही भारतीय संघाने दाखवलेल्या कौशल्याने सर्वांना प्रेरित केलं आहे. हा विजय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून दिव्यांग व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आणि देशाला गौरवाचा क्षण देणारा आहे.
टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा विजय भारतीय क्रिकेटसाठी एक मैलाचा दगड ठरला असून, यामुळे देशभरात दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.