देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे नरेंद्र मोदींच्या हस्ते आज लोकार्पण; या आहेत सुविधा

केरळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. १,१३६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प केरळसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. वॉटर मेट्रोची सुरुवात पहिल्यांदा ८ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींसह होईल, नंतर त्यांची संख्या वाढविली जाईल. मेट्रो ट्रेनप्रमाणे ती पूर्णपणे वातानुकूलित असेल आणि दररोज १५ मिनिटांच्या अंतराने १२ तास धावणार आहे. सध्या २३ बोटी आणि सुरुवातीला १४ टर्मिनल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मेट्रोमध्ये ५० ते १०० प्रवासी बसू शकतात.

वॉटर मेट्रोवरील प्रवासाचे किमान भाडे २० रुपये आहे, जे नियमित प्रवासी आहेत, ते बस किंवा लोकल ट्रेनसारखे साप्ताहिक आणि मासिक पास देखील घेऊ शकतात. दरम्यान, साप्ताहिक भाडे १८० रुपये असेल, तर मासिक भाडे ६०० रुपये असेल, तर तिमाही भाडे १,५०० रुपये असणार आहे. एवढेच नाही तर प्रवाशांना एकच स्मार्ट कार्ड वापरून कोची मेट्रो ट्रेन आणि वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही कोची वन अ‍ॅप वापरू शकता.

वॉटर मेट्रो म्हणून चालवल्या जाणार्‍या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधल्या आहेत. कोची वॉटर मेट्रो शहराच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील आर्थिक उपक्रमांना चालना मिळू शकेल. कोची आणि जवळपासच्या दहा बेटांदरम्यान वॉटर मेट्रो सुरू होत आहे. कोची वॉटर मेट्रो पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि विट्टीला-कक्कनड टर्मिनल दरम्यान सुरू होईल.