नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशावरुन चीनची नेहमीच आगळीक सुरु असते. मात्र चीनच्या याच आगळिकीला भारतानं आपल्या एकाच कृतीतून सडेतोड उत्तर दिलं आहे. चीनमधील एका स्पर्धेसाठी जाणारा भारतीय संघ विमानतळावरुनच माघारी फिरला आहे. भारताच्या या कृतीमुळे चीनलाही जबर धक्का बसला आहे. चीननं अरुणाचल प्रदेशच्या काही खेळाडूंना स्टॅम्प्ड व्हिसाऐवजी स्टेपल्ड व्हिसा दिल्यानं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत!
चीनमध्ये ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’ या नावाने मार्शल आर्टच्या स्पर्धा भरवल्या जातात. यासाठी भारतातूनही संघ पाठवला जातो. याहीवर्षी भारताकडून असा संघ पाठवण्यात आला होता. या संघात अरुणाचल प्रदेशमधील तीन खेळाडूंचा समावेश होता. मात्र, चीननं व्हिसा देताना इतर खेळाडूंना ‘स्टॅम्प व्हिसा’ दिला असून फक्त अरुणाचलमधल्या तीन खेळाडूंना ‘स्टेपल्ड व्हिसा’ जारी केला. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भारतानं आपला संघच माघारी बोलवला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. “चीनचा हा निर्णय अस्वीकारार्ह आहे. अशा प्रकारच्या कृतीला योग्य तऱ्हेनं उत्तर देण्याचे अधिकार भारताकडे आहेत. भारताचं वैध पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना व्हिसा देताना त्यांच्या प्रादेशिकतेच्या आधारावर त्यांच्यात भेदभाव केला जाऊ नये या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आम्ही यासंदर्भात आमची भूमिका चीनी प्रशासनाला कळवली आहे”, असं बागची म्हणाले.
दरम्यान, चीननं आरोप फेटाळताना असं काही नसल्याचा दावा केला आहे. “संबंधित तीन खेळाडूंनी १६ जुलै रोजी व्हिसासाठी अर्ज केला. तोपर्यंत इतर खेळाडूंचे अर्ज पुढे पाठवण्यात आले होते. त्यामुळे त्या तीन खेळाडूंची कागदपत्रे स्वीकारण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर चीन दूतावासानं त्यांचे पासपोर्ट स्टेपल्ड व्हिसासह परत दिले”, असं चीनकडून सांगण्यात आलं आहे.
#WATCH | MEA spokesperson Arindam Bagchi says, "It has come to our notice that Stapled visas were issued to some of our citizens representing the country in an international sporting event in China. This is unacceptable. And we have lodged our strong protest with the Chinese side… pic.twitter.com/hXuox50mq9
— ANI (@ANI) July 27, 2023